top of page
Search

हे स्वागत आहे?

  • Writer: jayashreedesaii
    jayashreedesaii
  • Jul 31, 2020
  • 2 min read


आज एकतीस डिसेंबर! इंग्रजी कलेंडरप्रमाणे मावळत्या वर्षाचा शेवटचा दिवस उद्या एक जानेवारी ! नववर्षाचा पहिला दिवस ....आणि आपण सगळे या दोन वर्षांच्या मधल्या ‘नो मॅन्स लँड’च्या उंबरठ्यावर उभे असलेले.... मावळत्या वर्षाचा हिशेब मांडत नवीन वर्षाची स्वप्ने बघणारे..... नवीन वर्षाकडे आस लावून बसलेले... पण किती गंमत आहे ना... आज सगळी रोषणाई, सगळ्या पार्ट्या, सगळी धमाल, फटाक्यांची आतषबाजी वाट्याला येईल ती मावळत्या वर्षाच्या... आणि उद्याचा उगवतीचा, आपल्याला खूप काही आशा असलेला सूर्य मात्र एकाकीपणे उगवेल. त्याचं स्वागत करायला कुणीच जागं नसेल, कारण मावळतीला निरोप देताना केलेली धमाल सगळ्यांच्याच डोळ्यावर आली असेल... मूल्य ....संस्कार हे फार मोठे शब्द झाले..... पण आपण आपल्या जगण्याचं तंत्रच उफराटं करून टाकलंय असं नाही वाटत? उगवत्या सूर्याला नमस्कार करून दिवस सुरू करणारे आपण, आज मोबाईलमध्ये आणि दारू मध्ये रात्र बुडवून सकाळी उशिरा उठून लागलो आहोत.... त्यापायी शरीरात भरणारा आळस आपल्या उत्साहावर, ‘प्रॉडक्टिविटी’वर विपरीत परिणाम घडवतो आहे. आपल्याला अनेक आजारांचं ‘गिफ्ट’ देतो आहे पण त्याची आपल्याला जाणीव नाही...फिकीर नाही! ‘समुद्र वसने देवी पर्वत स्तन मण्डले, विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद: स्पर्श क्षमस्वमे।‘ असं म्हणून पलंगावरुन उतरताना भूमीलाही वंदन करून तिची क्षमा मागणारे आपण, आज ज्या भूमीवर नांदतो आहोत तिचीच अक्षम्य हेळसांड करत आहोत...आज तर हा श्लोकही फारसा कुणाला माहित नसेल...त्यामुळे तो म्हणणे वा तो म्हणून भूमातेची क्षमा मागणे तर दूरच ! तीच अवस्था आपण अर्थातच आपल्या जन्मदात्यांची सुद्धा केली आहे... कारण चैन, स्वार्थ हाच जिथे धर्म बनला आहे तिथे हे असं भूमातेचं, जन्मदात्यांच ऋण मानणं वगैरे सर्वच ‘आऊटडेटेड’ झालं आहे वाढदिवस सुद्धा आज तरुण मुलं-मुली मध्यरात्री 12 वाजता रस्त्यावर कुणाच्या तरी स्कूटरवर केक ठेवून, तिथेच कापून, उघड्यावर खाऊन साजरा करत आहेत.... त्या वाढदिवसात त्यांचे जन्मदातेही सामील नसतात. औक्षणाचे पावित्र्य या वाढदिवसाला कुठून येणार? मध्यंतरी माझी एक तरुण सहकारी नवरात्रातल्या देवीच्या प्रतिमेतील कमळाला जे ‘डिटॅचमेंट’ प्रतिक मानलं जातं, त्यासाठी देवीला नावं ठेवत होती. कारण तिच्या अल्प ज्ञानानुसार ‘डिटॅचमेंट’चा अर्थ तिने ‘घृणा’ असा घेतला होता आणि देवी ही बाई असल्याने तिच्या मध्येही अवगुण असणारच. मग त्याविषयी लिहायला काय हरकत आहे? असा तिचा सवाल होता! आपण वाईटाची पूजा करत नाही, चांगल्याची पूजा करतो, देवीची पूजा ही शक्तीची पूजा आहे हे तिला समजतच नव्हतं..... हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. पण आज दुर्दैवाने आपण मावळतीची, अवगुणांचीच पूजा करायला लागलो आहोत आणि उगवतीला नमस्कार करायचे विसरूनच गेलो आहोत हे आपल्या लक्षात येतंय? त्यामुळेच, उगवणारा सूर्य उद्या मलूल, एकाकीच असणार आहे आणि मावळतीला मात्र दारू, डी.जे. आणि नाच गाण्यांना ऊत येणार आहे! आणि हा म्हणे नव वर्षाच्या स्वागता चा उत्सव आहे!

मावळतीच्या शृंगाराला आपण उगवतीच्या स्वागताचे फक्त नाव देतो आहोत !

 
 
 

Recent Posts

See All
३ शतकांचा वनवास संपत आला !

अयोध्येतील सुवर्ण क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे ....रामाचा आधुनिक वनवास संपायचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. सारी अयोध्या एखाद्या...

 
 
 
स्वप्नपूर्तीच्या दिशेने!

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी नेत्रदीपक रोषणाईने नटलेली, आकर्षक भित्ती चित्रांनी सजलेली अयोध्या बघताना मन नकळत भूत काळात...

 
 
 
अरेरे!

शिवसेनेची आज कीव येते आहे! आधी राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेस पुढे, त्यांच्या इटालियन नेतृत्वापुढे सरकार स्थापनेसाठी...

 
 
 

Comments


bottom of page