३ शतकांचा वनवास संपत आला !
- jayashreedesaii
- Aug 7, 2020
- 3 min read
अयोध्येतील सुवर्ण क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे ....रामाचा आधुनिक वनवास संपायचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. सारी अयोध्या एखाद्या नववधुप्रमाणे नटली आहे. देशावर करोनाचे संकट असताना व अयोध्येत त्या कार्यक्रमासाठी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश असतानाही अयोध्येचे घाट आता माणसांनी फुलून गेले आहेत. रस्तो रस्ती रांगोळ्या घातल्या गेल्या आहेत, भिंती रामायणातील प्रसंगांनी रंगल्या आहेत, दिव्यांची रोषणाई तर डोळ्यांचे पारणे फेडते आहे ......राम मंदिरासाठी गेलेल्या शिलांमधील एक शिला माझीही आहे हा आनंद आज अनेक घरांतून ओसंडतो आहे.
ही जादू कळण्यासाठी राम कळावा लागतो आणि त्या रामाचे या भूमीशी, आपल्या रक्ताशी असलेले नाते उमजावे लागते....इथल्या कणाकणात राम आहे! इथल्या संस्कारांत राम आहे आणि म्हणूनच या देशाची स्वतंत्र ओळख, या देशाचा मूळ स्वभाव असंख्य परकीय आक्रमणांनंतरही शाबूत आहे! बाबर आणि त्याचे वंशज टिकले नाहीत पण आपल्या मनात आणि आपल्या जीवनात राम टिकून राहिला....तो टिकून राहायलाच हवा आणि त्या साठीच उद्याच्या भूमिपूजनाचं स्वागत सर्वांनीच करायला हवं!
‘आहेत त्या मंदिरांची नीट देखभाल आपल्याला जमत नाही, मग त्या एका मंदिरासाठी एवढे आंदोलन कशाला?’ ‘राम तर सर्वत्रच आहे, मग त्याच ठिकाणी मंदिर कशाला?’असे प्रश्न विचारले गेले, रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लावले गेले, ‘त्या ठिकाणी एखादे इस्पितळ उभारा, सर्वधर्मसमभावाचे एखादे स्मारक उभारा असेही सल्ले दिले गेले. या आंदोलनामुळे भारत दुसऱ्या फाळणीकडे जाईल, हिंदू- मुस्लीमांमधील तेढ वाढेल अशी भीतीही सतत व्यक्त करण्यात आली. ६ डिसेंबर १९९२ नंतर तर हिंदू- मुस्लीमामधील दरी अधिकच वाढलीय अशी भीतीही व्यक्त व्हायला लागली होती. तसे काही ठिकाणी दिसूही लागले होते. तत्कालीन भाजपाध्यक्ष व राम मंदिरासाठी रथ यात्रा काढून सारा देश ढवळून काढणारे लालकृष्ण आडवाणी यांना बिहारमधील समस्तीपूर येथे अटक झाली. ते तिथून सुटल्यावर त्यांनी अहमदाबादपासून पुन्हा रथयात्रा सुरु केली. लोकप्रभेसाठी ती कव्हर करायची संधी मला मिळाली होती. त्या वेळी या आंदोलनासंबंधी त्यांची प्रदीर्घ मुलाखत मला घेता आली. २-३ भागांत ती तिथे प्रसिद्धही झाली होती. त्या वेळी मी त्यांना एक प्रश्न विचारला होता, “ ६ डिसेंबरच्या घटनेमुळे हिंदू -मुस्लिमांमधील दरी अधिकच वाढलीय असे तुम्हाला वाटत नाही का?’
त्याचे उत्तर देताना ते म्हणाले होते, “नाही. उलट या घटनेमुळे मुस्लीम समाजात जी चिंतनाची प्रक्रिया सुरु झाली आहे ती जातीय सलोखा निर्माण करेल’’
१९९२ साली त्यांनी उच्चारलेले हे शब्द, त्यांनी व्यक्त केलेला हा अंदाज खरा ठरला आहे! अगदी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राम मंदिराच्या बाजुने आला तरी ज्या पद्धतीने तो मुस्लीम समाजाने स्वीकारला त्यातूनही हेच दिसले. उद्या अयोध्येत साजऱ्या होत असलेल्या सोहळ्यासाठीच नव्हे तर प्रस्तावित राम मंदिरासाठीही मुस्लीम समाजाचे असलेले हे सक्रीय योगदानही लक्षात घेतले पाहिजे. त्याचे कौतुक केले पाहिजे.
अयोध्या आंदोलनाने अनेक गोष्टी साधल्या. राजकारणातील धर्माचे स्थान या आंदोलनाने सर्व प्रथम उजेडात आणले. बेगडी धर्म निरापेक्षतेचा बुरखा फाडण्याचे श्रेयही याच आंदोलनाकडे जाते. सर्व राजकीय पक्षांचा खरा चेहेरा याच आंदोलनाने दाखवला. भारतातील शेकडो साधू-संत, विविध पीठांचे -आखाड्यांचे प्रमुख एखाद्या मुद्द्यावर एकत्र येऊ शकतात हे या आंदोलनामुळे आपल्याला समजले आणि त्याच वेळी राजकारणाचा स्पर्श होताच सर्व संग परित्याग केलेल्या साधू- संन्याशांचेही राजकीयीकरण कसे होऊ शकते तेही पाहायला मिळाले. न्यायालयांचा राजकीय वापर आणि राजकीय प्रश्नांची सोडवणूक करण्याची न्यायालयांची अगतिकता हीही या आंदोलनाने दाखवून दिली आणि त्याच बरोबर न्यायालयांनी ठरवलं, त्यांची व राजकीय इच्छाशक्ती एक झाली तर शेकडो वर्षं चिघळलेला, न्यायालयांत खितपत पडलेला एखादा प्रश्नही सर्वांना मान्य होईल असा निकाल देत कसा निकाली निघू शकतो तेही पाहायला मिळाले. जो प्रश्न श्रद्धेचा आहे, त्यामुळे न्यायालयाच्या कक्षेत येऊच शकत नाही असे मानले जात होते त्या प्रश्नाचा गुंता अखेर न्यायालयानेच सर्वांना मान्य होईल अशा पद्धतीने सोडवला आणि आपल्या सर्वच बांधवांचं कौतुक करायला हवं, की त्यांनी तो अतिशय प्रगल्भपणे स्वीकारला.
हीच प्रगल्भता, हीच एकात्मता या पुढेही दिसेल अशी खात्री बाळगू या! आणि प्रभू रामाचा तब्बल ३ शतकांचा आधुनिक वनवास संपल्याचा आनंद जल्लोषात साजरा करू या!
जय श्रीराम !
--------------------------
Comments