सण राखीचा ...
- jayashreedesaii

- Jul 31, 2020
- 2 min read
सण राखीचा ...
माझ्या एका १२-१३ वर्षाच्या भाचीने मला परवा विचारलं की मावशी तुझं आणि तुझ्या भावाचं, म्हणजे मामाचं अजूनही भांडण होतं का गं? आणि मी अभिमानाने उत्तर दिलं की अर्थात! होतंच आणि व्हायलाच पाहिजे....आणि भांडणाला कोणताही विषय पुरतो. अगदी लता चांगली की आशा इथपासून ते विराटने जो शॉट मारला तो बरोबर की चूक इथपर्यंत! आणखी एक गंमत असते, मी जे करते ते काहीच त्याला पटत नाही आणि तो जे करतो ते मला. पण एवढं सगळं असूनही तो जगातला सर्वात उत्तम भाऊ आहे असं माझं मत आहे आणि मी जगातली सर्वात चांगली बहिण आहे असं त्याचं मत आहे ...त्यामुळे राखी पौर्णिमा असो वा नसो, आमच्यातला प्रेमाचा धागा अतूट आहे! किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर आमच्यातलं नातं आता त्या राखीच्या सोपास्काराच्या पलीकडे गेलं आहे ...
पण आमचंच कशाला, प्रत्येकच बहिण-भावाचं नातं असंच असतं ना? किंवा असायला हवं ना? ते प्रेम, ती भांडणं, ते रुसवे फुगवे, ती मनधरणी...ते एकमेकांसाठी जीव तुटणं, ते प्रत्येक गोष्टीतून आपलं बालपण शोधणं, जपणं....
हे एकच नातं असं आहे जे आपला, आपल्या बालपणाशी असलेला धागा जिवंत ठेवतं, आपलं वय कितीही वाढलं तरी आपल्या बाळ मुठीत त्या बालपणीच्या लपवलेल्या काचा घट्ट धरून ठेवतं...
या नात्याची किंवा आपल्या संस्कृतीची एक गंमत आहे. ती म्हणजे, आपण हे अगदी असंच नातं चंद्राशीही जोडतो. ज्यांना भाऊ नसतो त्यांच्यासाठी तर चंद्र हाच हक्काचा भाऊ असतो. प्रत्यक्षात तो कधीच आपल्या समोर मानवी रुपात येत नाही, आपल्याला ओवाळणी घालत नाही, पण तरीही आपल्याला तो आपला भाऊच वाटतो, कारण बहिणीच्या मायेला ओवाळणीची ओढ नसते, तर मायेची असते आणि आपल्या शीतल किरणांनी ती मायेची हळुवार सोबत करण्याचं काम चंद्र बरोब्बर करतो.
आता विज्ञान प्रगत झालंय. चंद्रावर मानवी वस्ती नाही, खालून आपल्याला दिसतात ते ससे –हरणं वगैरे काही नाही हे आपल्याला कळलंय. अगदी यंदाच आपला सुवर्ण महोत्सव साजरा करत असलेल्या आपल्या ‘इस्रो’नेही चांद्र यान पाठवून चंद्रासंबंधी, पृथ्वीसंबंधी बरीच माहिती गोळा केलीय. पण म्हणून आपल्या व चंद्राच्या भावुक नात्यात थोडाच फरक पडलाय?
अर्थात असंच भावूक नातं आपलं त्या ‘इस्रो’बरोबर सुद्धा आहे. अवकाश विज्ञानातलं भले आपल्याला काहीही कळत नसेल, पण तरीही सर्व भारतीयांच्या अभिमानाचं ते निधान आहे. आणि ते स्वाभाविकच आहे. महासत्तांनी फारसं सहकार्य केलं नाही तरीही आपल्या शास्त्रज्ञांनी स्वतःची बुद्धी पणाला लावून आज जे यश कमावलंय, अवकाश क्षेत्रात जी भरारी मारलीय ती थक्क करणारी आहे. याची सुरुवात झाली १९६२ मध्ये. भारताने अवकाशात भरारी मारून त्या विज्ञानाचा वापर भारताच्या विकासासाठी करायचं ठरवलं तेव्हा!
प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली त्या वर्षी ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ची स्थापना झाली. त्याचंच रुपांतर १९६९ मध्ये ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’मध्ये झालं. डॉ. विक्रम साराभाई, आपल्या सगळ्यांचेच दैवत बनलेले डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचं नेतृत्व तिला लाभलं आणि आज अवघ्या ५० वर्षांत इस्रो ही जगातल्या ६ सर्वोच्च ‘स्पेस’ संस्थांमध्ये अभिमानाने विराजमान झाली आहे. कधी काळी आपण आपले उपग्रह इतर देशांच्या मदतीने सोडत होतो. आज इतर देश त्यांचे उपग्रह अवकाशात नेण्यासाठी आपली मदत घेतायत. एका वेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम जसा ‘इस्रो’ने केलाय, तसंच सर्वाधिक सॅटलाईटसचा ताफा बाळगणाऱ्या अवकाश विज्ञान संस्थांमध्ये आज ‘इस्रो’ अग्रस्थानी आहे . १९७५ साली ‘आर्यभट्ट’ हा पहिला उपग्रह सोडणाऱ्या इस्रोने गेल्या वर्षीच उपग्रहांची शंभरी पार केलीय. चांद्रयान १ आणि २ , मंगळ यान यांच्या यशानंतर ‘इस्रो’ आता अंतराळवीर अवकाशात धाडण्याइतकी समर्थ बनली आहे.
थोडक्यात काय तर चंद्राबरोबरचं आपलं नातं आता केवळ सांकेतिक राहिलेलं नाही! ते खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आलं आहे आणि त्याचं श्रेय जातं ते ‘इस्रो’ला.
भावा--बहिणीच्या नात्याची कहाणी कुठे सुरु झाली आणि कुठे जाऊन पोहोचली...पण हीच तर नात्यांची गंमत असते ना?


Comments