top of page
Search

सुपर सिनियर्स -२

  • Writer: jayashreedesaii
    jayashreedesaii
  • Jul 31, 2020
  • 3 min read

परवा मी लिहिलेल्या लतादीदी, आशाताई, डॉ प्रभा अत्रे, अभिनेते रमेश देव यांच्यासारख्या ‘सुपर सिनियर्स’च्या पोस्टला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. व्हॉटस अप व फेसबुकवरुन ती इतक्या प्रचंड प्रमाणात शेअर झाली की दिवसभरात किमान ३-४ जणांकडून ती मलाच परत आली. आपलं बाळ घरी आलं की व्हावा तसा आनंद मला झाला. कारण ती इतक्या लांबून लांबून व रोज माझ्या संपर्कातही नसलेल्या लोकांपर्यंत पोहोचली होती व ती आवडल्याचं सांगत त्यांनी ती कॉपी-पेस्ट करून मलाच पाठवली होती! ती पोस्ट आवडल्याने एका मोठ्या प्रकाशन संस्थेने मला, अशी आणखी काही, ८५ च्या पुढची माणसं निवडून पुस्तक करायला सांगितलं. ‘आयबीएन लोकमत’सारख्या अग्रेसर वाहिनीने त्यावर ‘सुपर सिनियर्स’ या शीर्षकाने एक स्टोरी केली. त्यात माझीही बाईट घेतली. फोन व मेसेजेस तर दिवसभर चालू होते. सोशल मीडियाची ताकद मला माहित असली तरी हा प्रतिसाद मला थक्क करणारा होता.

खरं तर वाढदिवसाचे सोहळे साजरे करणं आणि वयाचं मोजमाप करत बसणं ही आपली संस्कृतीच नव्हती. तीही आपण पाश्चात्यांकडून घेतली. तिथे २ वर्षांचा मुलगाही ‘२ इयर्स ओल्ड’ असतो. ही आपली पद्धत नाही. त्यामुळे सोहळे साजरे करणं, मजा करणं इथपर्यंत ठीक आहे. पण ते वाढतं वय ही फार काही मनाला लावून घेण्याची गोष्ट नाही. श्रीकृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगावर अढळ निष्ठा असणारा आपला देश होता व आहे. ज्यांच्याबद्दल मी लिहिले ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले कर्मयोगीच आहेत आणि त्यामुळेच त्यांचा तो ध्यास अद्याप टिकून आहे.

गंमत म्हणजे माझ्या त्या पोस्टला उदंड प्रतिसाद मिळत असतानाच मेधाताई पाटकर यांच्या सहकारी, स्वतः अतिशय तळमळीच्या कार्यकर्त्या असलेल्या विजयाताई चौहान यांची एक पोस्ट माझ्या व्हॉटसअप वर आली. त्याही, त्यांचं कागदोपत्री वय ७४ असलं तरी ते विसरून काम करणाऱ्या कार्यकर्त्या. त्यांनी माझी पोस्ट वाचलेली नव्हती. पण त्यांनी अशाच एका ध्यासमग्न, ऋषितुल्य व्यक्तिमत्वाबद्दल लिहिलं. ती पोस्ट जशीच्या तशी येथे उधृत करत आहे.

त्या लिहीतात,

‘युसूफ मेहेरली सेंटरचे अध्यक्ष डॉ जी. जी. पारीख. वय वर्षे 94, पहाटे 4 वाजता उठतात व ‘I Pad’ वर अध्यक्ष या नात्याने स्वत:चा पत्र व्यवहार स्वतः करतात. काल साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात चालू झालेल्या दोन दिवसांच्या ‘आपत्ती निवारण’ या विषयावरील बैठकीत पहाटे 4 पासून रात्री 10 पर्यंत अथकपणे सक्रिय सहभाग. कोणतीही सवलत घेत नाहीत. जेवणघर थोडे अंतरावर आहे, पण चालत जाऊन तेथेच जेवण घेतले, स्वतःसाठी मागवले नाही. दिवसाकाठी किमान 12 तास काम. आठवड्यातून 3 दिवस 70 km वरील तारा येथे प्रवास. वेळप्रसंगी बडोदा, बंगलोर इकडेही रेल्वेने 2nd AC तूनच प्रवास. खूप उंच आहेत. त्यामुळे खरं तर मावत नाहीत खालच्या बर्थवर. दिवसाकाठी किमान 3 तास वाचन. 2 ऑक्टोबरला 5 तथाकथित शहरी नक्षलवाद्यांच्या अटकेविरुद्ध शांताश्रम येथे उपोषणाला बसत आहेत. लिहावे तेवढे थोडे या तपस्वी व्यक्तिमत्वाबद्दल. मुलगी, जावई, नातू आहेत, तरीही स्वत:ची सर्व मिळकत सामाजिक संस्थांना दिली आहे मृत्युपत्रात. अगदी ग्रांट रोड येथील स्टेशनजवळील त्यांच्या फ्लॅटसह. त्यांचा एक फ्लॅट तर कायमच संस्था व सार्वजनिक गोष्टींसाठी वापरला जातो. घरात एक सहाय्यक व ते एकटे असे राहातात. अत्यंत साधी राहणी. वैचारिक बांधिलकी पक्की. समाजातील वंचित व शोषितांसाठीच आयुष्यभरचे जगणे.

स्वत:त काय आणू शकते मी त्यांच्या या जगण्यातील?’

विजयाताई खरं तर स्वतः अशा वयात आहेत की ‘आमच्या वेळी असं होतं’ वा ‘असं नव्हतं’ असं म्हणत तरुणांना नावं ठेवणं, उपदेशाचे ‘डोस’ देणं त्यांना जास्त शोभलं असतं. पण आज याही वयात त्यांना प्रश्न पडतोय की ‘स्वत:त काय आणू शकते मी त्यांच्या या जगण्यातील?’

हे प्रांजळ शैशव जर मनात जपलं तर पिकलेले केस आणि थकलेली गात्रं काय बिघडवू शकतात आपलं?

तर हे डॉ जी. जी. पारीख म्हणतात, ‘मी मेडिकलला असताना आम्हाला असं शिकवलं गेलंय की थकवा, कंटाळा हे सगळे मनाचे खेळ असतात. मी ते खेळत नाही आणि दुसरं म्हणजे माझं वय कितीही झालं तरी जो पर्यंत समतेवर आधारित समाजाची निर्मिती करण्याचं माझं स्वप्न पूर्ण होत नाही तो पर्यंत मी काम करतच राहणार!

वय वर्षे फक्त ९४!

अशांच्या पुढे खरं तर आपलं तोंड उघडायचीही लाज वाटते...किती फालतू गोष्टींचा बाऊ करत असतो ना आपण?

जयश्री देसाई

ree

डॉ जी जी पारीख

 
 
 

Recent Posts

See All
३ शतकांचा वनवास संपत आला !

अयोध्येतील सुवर्ण क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे ....रामाचा आधुनिक वनवास संपायचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. सारी अयोध्या एखाद्या...

 
 
 
स्वप्नपूर्तीच्या दिशेने!

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी नेत्रदीपक रोषणाईने नटलेली, आकर्षक भित्ती चित्रांनी सजलेली अयोध्या बघताना मन नकळत भूत काळात...

 
 
 
अरेरे!

शिवसेनेची आज कीव येते आहे! आधी राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेस पुढे, त्यांच्या इटालियन नेतृत्वापुढे सरकार स्थापनेसाठी...

 
 
 

Comments


bottom of page