वसुधैव कुटुंबकम ते TTMM
- jayashreedesaii

- Jul 31, 2020
- 2 min read
स्वामी जयेंद्र सरस्वती हे सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य झाले तेव्हा त्यांना भेटण्याचा, त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला होता.
त्या वेळी मीनाक्षीपूरमच्या सामूहिक धर्मांतराची जखम ताजी होती. मुस्लिमांचे धर्मगुरु शाही इमाम, ख्रिश्चनांचे धर्मगुरू पोप जॉन पॉल फारच जोरात होते आणि हिंदुंचे पाच पाच शंकराचार्य असूनही कुणीच काहीच बोलत नव्हते. मला हे फार खटकत होतं. त्यामुळे तारुण्याच्या आवेशात मी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना विचारलं की मुस्लिमांच्या बाबतीत जरा कुठे खुट्ट झालं की शाही इमाम बोलणार, ख्रिश्चनांच्या बाजुने पोप बोलणार, मग आम्ही तुम्हाला आमचे धर्मगुरू मानतो पण तुम्ही तर आमच्या बाजुने काहीच बोलत नाही? एवढं मीनाक्षीपूरमसारखं सामूहिक धर्मांतर होऊनही तुम्ही गप्पच आहात?
त्यावर ते उसळून म्हणाले होते, ‘मी काय, कुणीच त्यावर प्रतिक्रिया द्यायलाच नाही पाहिजे. कारण हिंदू धर्म हा कधीच प्रतिक्रियावादी धर्म नव्हता व असणारही नाही आणि म्हणूनच तो टिकला, सगळ्यांना आपल्यात सामावून घेत वाढत राहिला. त्याचं ते स्वरुप बदललंच नाही पाहिजे. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही आपली संस्कृती आहे आणि तिला धक्का लागलाच नाही पाहिजे. मीनाक्षीपूरमसारखी प्रकरणं घडू नयेत या साठी धर्म त्या वंचितांपर्यंत नेला पाहिजे, धर्माचं स्वरूप बदलण्याची काहीच गरज नाही.’
आणि ते त्यांनी आयुष्यभर खरंच केलं! त्यांनी अत्यंत कर्मठ असलेला, परिणामी ब्राह्मणांपुरताच बंदिस्त असलेला कांची मठ सर्वसामान्यांपर्यंत नेला. ते दलित वस्त्यांपर्यंत गेले. तिथे फिरले. त्यांच्या अडचणी व सामूहिक धर्मान्तरामागची त्यांची अगतिकता ओळखून त्यांनी शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात मोठं काम उभं केलं. दलितांचे अनेक पूजाविधी, परंपरा यांचा संकर हिंदू धर्माशी घालून देण्याचं, अनेक लोक कलांच्या पुनरुज्जीवनाचं कामही त्यांनी केलं!
हे ‘वसुधैव कुटुंबकम’!
आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे तिथून सुरु झालेला आपल्या संस्कृतीचा प्रवास आज कुठे येऊन पोहोचलाय? आपण त्या संस्कृतीला कुठे आणून ठेवलंय? ‘टीटीएमएम’पर्यंत? ‘तुझं तू, माझं मी’ पर्यंत?
किती अंधाराच्या वाटा खोदत चाललोय आपण?
आज चार वर्षांच्या, अभ्यास म्हणजे काय हेही समजत नसलेल्या मुलाला आई सांगते की तू कुठच्या क्लासला जातोयस हे तुझ्या मित्राला सांगू नकोस. तू तुझ्या पुरतं बघ. मग तो इतका त्याच्या पुरतं बघायला लागतो की त्याच्या परिघात त्याचे आई-बाबाच काय, पण त्याच्या साठी स्वतःचं घर सोडून आलेली त्याची बायकोही नसते. आजकाल तर बघून थक्क व्हायला होतं की रिलेशनशिपमध्ये असलेले ‘तो’ आणि ‘ती’ जेव्हा हॉटेलमध्ये जातात, तेव्हा त्याचं खाण्याचं बिल तो भरतो व तिच्या खाण्याचं ती? ‘TTMM’! ---‘तुझं तू, माझं मी’! त्यात दोघांपैकी एकाला खायचं नसेल तर दुसरा त्याग वगैरे काही करत नाही. ‘तो’ वा ‘ती’ मागवते आणि खाते. त्यातही आपल्या प्रियकराला वा प्रेयसीला त्यातला एक घास द्यावा असा काही विचारही नसतो ....याला रिलेशनशिप म्हणायचं?
एका जुन्या मराठी सिनेमात नायिकेला उद्देशून एक गाणं होत...सवाल –जबाबाचा भाग होता...’कोण होतीस तू...काय झालीस तू?’ ...ते आता आपल्या संस्कृतीला म्हणावंसं वाटतंय ...कोण होतीस तू, काय झालीस तू?
पण संस्कृती म्हणजे तरी कोण? तुम्ही आणि आम्हीच ना? आपणच ‘वसुधैव कुटुंबकम’चे संस्कार मुलांवर करण्यात अपयशी ठरलोय ना?
कारण तो साक्षात्कार आपल्याला फक्त असा पूर वगैरे आला की मगच होतो ...एरवी चालू असतं ‘टीटीएमएम’!
आपण माणसाशी नातं नाही जोडू शकत आहोत..’तो’ वा ‘ती’ व ‘ते’ कितीही जवळचे असले तरी...ईश्वराशी काय जोडणार, कप्पाळ?


Comments