top of page
Search

मला देव भेटला !

  • Writer: jayashreedesaii
    jayashreedesaii
  • Jul 31, 2020
  • 2 min read


एकदा, तेव्हा सातवी –आठवीत असलेल्या माझ्या मुलाने मला विचारलं की ‘आई, तू इतकं देवाचं करतेस, मग तुला तरी कधी देव दिसलाय का?’

मी उत्तर दिलं की, ‘हो! मला सारखाच भेटतो तो!’

तो आश्चर्य चकित झाला. म्हणाला, ‘काय सांगतेस?’

मी शांतपणे सांगितलं की ‘हो, मला खरंच तो सारखाच दिसतो. भेटतो. पण याचा अर्थ तो पिवळा पितांबर आणि डोक्यावर मुगुट किंवा शंकर असेल तर गळ्यात साप, डोक्यावर गंगा आणि हातात डमरू अशा वेशात दिसतो अशी तुझी कल्पना असेल तर तसा दिसत नाही. तसा दिसणारही नाही, कारण प्रत्येक देव तसा-तसा दिसतो ही शेवटी माझीच म्हणजे मानवी कल्पनाच आहे ना! प्रत्यक्षात तो निर्गुण निराकार आहे. प्रकाशाचा प्रचंड मोठा सागर आहे. पण आपण सामान्य आहोत. पूजा करायची, आराधना करायची, ध्यान करायचे तर आपल्याला समोर काही तरी असावे लागते. म्हणून आपणच त्याला लाडा कोडाने विविध रूपांमध्ये कल्पिले आहे. लक्ष्मी म्हणजे लाल साडी, सरस्वती म्हणजे पंढरी साडी ....सरस्वती मोरावरच बसणार ...या सगळ्या आपल्या कल्पना आहेत. त्या कल्पनांमागेही काही प्रतिकं आहेत. ती आपण समजून घेतली पाहिजेत. सरस्वतीचंच उदाहरण घ्यायचं झालं तर वेद काळात ती ‘आरोग्य दायिनी’ म्हणून पुजली जात होती. कारण तिच्या पाण्यात औषधी गुण होते. तेव्हा ती विद्येची देवता नव्हती. मोर हे तिचं वाहन आहे, कारण तिच्या काठावर मोर भरपूर होते, आजही त्या पट्ट्यात मोर भरपूर आहेत हे तर आहेच. पण त्या काळात अशी धारणा होती की माणूस मेल्यानंतर त्याचा आत्मा मोर स्वर्गापर्यंत घेऊन जातात. म्हणूनच हडप्पा -मोहेंजदडोमध्ये उत्खननात जी भांडी सापडली आहेत त्यांच्या वरच्या चित्रांत मोराच्या पोटात खूप सारे आत्मे गोळ्या गोळ्याच्या स्वरुपात दाखवले आहेत. सरस्वती ही आरोग्यदायिनी नदी, तिच्या काठावर ऋषींना मंत्र स्फुरले म्हणून ती ज्ञानदायिनी मानली जायला लागली आणि त्यामुळेच मुक्तिदायिनी ठरली. मोर हे तिचं वाहन ठरले ते त्या मुळेच! पुढे ज्ञान जेव्हा लिखित स्वरुपात आलं, पुस्तक छापणं हे जेव्हा शक्य झालं तेव्हा तिच्या हातात पोथी आली. म्हणजे आठव्या शतकानंतरच्या शिल्पात! मात्र संस्कृतीचा हा प्रवाह समजून न घेता आपण उपासना करतो आहोत, पोथ्या वाचतो आहोत, वेगवेगळी व्रतं करतो आहोत. त्याने देव नाही भेटत. कारण तो तिथे नाहीच आहे!

देव मला भेटतो तो माणसांत. प्रत्येक क्षणी तो कुणाच्या ना कुणाच्या रूपाने माझ्या मदतीला हजर असतो. मला तहान लागलेली असताना कुणी तरी पुढे धरलेल्या पाण्याच्या ग्लासात तो असतो. माझे पाय थकलेले असताना समोर लगेच येऊन थांबलेल्या टॅक्सीचालकाच्या रुपात तो मला भेटतो. मला सुचलेल्या शब्दांत तो असतो आणि मला रीझवणाऱ्या गाण्याच्या लकेरीतही तोच असतो. कधी तो परीक्षाही घेतो. ‘हे भोग माझ्याच वाट्याला का?’ असा करूण सवाल करायलाही भाग पाडतो. पण काही काळाने लक्षात येतं, की अरे, हा तर अतिशय कडक शिक्षक आहे. माझ्या भल्यासाठीच तर त्याने हे केलं. एरवी मी आपण होऊन थोडंच ते दुःख कवटाळणार होते?’

आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आजही तो असाच हजार हातांनी उभा राहिलाय. प्रत्येक पूरग्रस्त मला अमक्याच्या रूपाने -तमक्याच्या रूपाने देव भेटला अशीच प्रतिक्रिया देतोय आणि ते खरंही आहे. प्रचंड वेग असलेल्या पाण्याच्या प्रवाहात नाव लोटून अडकलेल्यांना वाचवणारा, म्हाताऱ्यांना--लहान मुलांना अक्षरशः हातात उचलून घेऊन सुरक्षित स्थळी नेणारा, भुकेलेल्यांना अन्नाचे घास भरवणारा हा देवच असू शकतो. त्याचे नाव काहीही असो, त्याचा धर्म कोणताही असो वा त्याचं रूप कसेही असो!

वाईट एवढंच वाटतं की माणसातला देव शोधण्याचं हे शहाणपण आपल्याला एरवी का सुचत नाही? त्यासाठी असं एखादं नैसर्गिक वा मानवनिर्मित संकटच का यावं लागतं?

 
 
 

Recent Posts

See All
३ शतकांचा वनवास संपत आला !

अयोध्येतील सुवर्ण क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे ....रामाचा आधुनिक वनवास संपायचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. सारी अयोध्या एखाद्या...

 
 
 
स्वप्नपूर्तीच्या दिशेने!

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी नेत्रदीपक रोषणाईने नटलेली, आकर्षक भित्ती चित्रांनी सजलेली अयोध्या बघताना मन नकळत भूत काळात...

 
 
 
अरेरे!

शिवसेनेची आज कीव येते आहे! आधी राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेस पुढे, त्यांच्या इटालियन नेतृत्वापुढे सरकार स्थापनेसाठी...

 
 
 

Comments


bottom of page