चिरतरुण!
- jayashreedesaii

- Jul 30, 2020
- 3 min read
Updated: Jul 31, 2020
आज एक विचार मनात आला. परवा भारतरत्न लता मंगेशकर यांचा नव्वदावा वाढदिवस होता. वयोमानानुसार येणाऱ्या तब्येतीच्या तक्रारी सोडल्या तर त्यांचा उत्साह, त्यांची स्मृती, त्यांची विनोद बुद्धी, त्यांचा जगण्यातला रस अजून टिकून आहे. त्या घराच्या बाहेर पडू शकत नसतील, पण अजुनही घराच्या चार भिंतींच्या बाहेर काय चाललंय याच्यातला त्यांचा रस टिकून आहे. घरातल्या प्रत्येक सदस्याच्या बाबतीत काय होतंय, देशात काय होतंय, संगीत विश्वात काय होतंय याची खडा न खडा माहिती त्यांना असते. त्यात रस घेऊन, पण अलिप्तता राखून त्या मजेत जगत असतात.
त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. वय वर्षे फक्त ९७. ‘दीदींच्या शंभराव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भाषण करायला मला बोलवा. मी येईन’ हे म्हणण्याची जिगर आज ९७ व्या वर्षीही टिकून असलेलं एक सदाबहार व्यक्तिमत्व. चिरतरुण व्यक्तिमत्व.
परवा ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींचा नव्वदावा वाढदिवस पार पडला. त्यांचेही तेच. पायाने चालता येत नाही. पण आजही त्या थिएटरमध्ये जाऊन त्यांचं सिनेमा बघायचं वेड पूर्ण करतात. जाहिरातींमुळे त्यांना टीव्हीवर सिनेमा बघायला आवडत नाही. जिथे लिफ्ट नाही अशा थिएटरमध्ये जाता येत नाही. पण माहीमच्या ‘सिटीलाइट’ थिएटरमध्ये लिफ्ट असल्याने त्या तिथे जाऊन सगळे सिनेमे बघतात.
परवा प्रख्यात अभिनेते रमेश देव यांच्याशी बोलत होते. वय वर्षे ९२. आजही व्यायाम करतात. कधी पोहायला जातात, पत्ते खेळायला तर रोजच क्लबमध्ये जातात आणि अजुनही कामेही करतात. आज या वयातही ते १२ तास काम करतात! गंमत म्हणजे आज या वयातही शिकार करायचा त्यांचा अत्यंत आवडता छंद त्यांना जोपासायचा आहे. सरकारने त्यावरची बंदी उठवावी अशी त्यांची इच्छा आहे.
प्रख्यात शास्त्रीय गायिका डॉ प्रभा अत्रे आज ८७ व्या वर्षीही घरचं सगळं करण्यापासून ते संगीताचा, त्यांच्या गुरुकुलाचा व्याप सांभाळण्यापर्यंत सगळं तर करतातच. पण गाडीही चालवतात. रिव्हर्समध्ये वेगाने गाडी चालवणं ही त्यांची आवड. खासियत. अगदी मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर त्या आजही हे करतात.
प्रख्यात गायिका आशा भोसले. आज ८५ वय ओलांडलं तरी त्यांचा आवाज तर शाबूत आहेच पण स्टेज शो करणं व गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली असतानाही स्टेजवर नाच करण्यापर्यंत सगळंच त्या आनंदाने करताना दिसतात.
लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण याही आज ८५ वर्षांच्या आहेत. पण पहाटे साडेचारला उठून पाणी भरण्यापासून ते घरी पापड -कुरडया-मसाले वगैरे करण्यापर्यंत आणि स्टेजवर जाऊन गाण्यापर्यंत कशाच्याच आड त्यांचं वय येत नाही.
माझ्या मामाने, माजी आ प्रभाकर संत यांनी गेल्याच आठवड्यात वयाची ९१ वर्षं पूर्ण केली. पण आजही तरुणाच्या तडफेने तो चार -पाच संस्थांचे काम बघतोय. त्यासाठी गच्च भरलेल्या लोकलने एकट्याने प्रवासही करतोय.
तरुण भारतचे माजी संपादक व रा स्व संघाच्या ‘थिंक टँक’मधील मा गो वैद्य तर आता शंभरीच्या जवळ पोहोचलेत. पण अजूनही बुद्धी शाबूत आहे. लिहीतात. ‘आम्ही काही मित्रांनी सेंच्युरी मारायची ठरवलीच आहे’ असं ते काही वर्षांपूर्वी मी त्यांना भेटले तेव्हा ते सांगत होते आणि आज त्याच दिशेने त्यांची शिस्तबद्ध वाटचाल चालू आहे.
ही यादी आणखी बरीच लांबवता येईल. आज खरंच असे असंख्य दिग्गज आहेत जे अगदी नव्वदी पार केल्यानंतरही सक्रीय आहेत. आपला आब राखून आहेत. आपल्या ज्ञानाचा समाजाला फायदा करून देताहेत आणि म्हातारपणाचा जणु अविभाज्य भाग बनलेली किरकिर न करता, उसासे न टाकता, मृत्यूची आळवणी न करता प्रत्येक क्षण आनंदाने जगताहेत. वयोमानानुसार येणाऱ्या व्याधी त्यांनाही आहेत. मात्र त्या त्यांचं मनोबल खच्ची करु शकलेल्या नाहीत. त्यांचा दुर्दम्य आशावाद झाकोळू शकलेल्या नाहीत. त्यांचा कामाचा ध्यास कमी करु शकलेल्या नाहीत. त्यांच्याकडे बघितलं की प्रश्न पडतो, की त्या नंतरच्या पिढ्यांचं नेमकं कुठे चुकलंय? शिस्तबद्ध आचार -विचार -व्यवहार नाही हे तर त्याचं कारण नाही? का आज अगदी तारुण्यात मधुमेह आणि हृदयविकाराने तरुणांच्या विकेट्स जाताना दिसतायत? का आपण जगण्याचा उत्साह गमावून बसतो आहोत? का आपल्यापैकी बहुतेक प्रत्येकाला वाटत असतं की आपण वयाची पंच्याहत्तरीही बघणार नाही?
आपण लढायच्या आधीच अर्जुनाप्रमाणे शस्त्रं तर टाकत नाहीय?
आपण जगण्याची इच्छा , उमेद तर गमावून बसलेलो नाही?
आपलं खरंच शरीर कमकुवत आहे की मन?
या प्रश्नांची उत्तरं कुणी शोधायची व त्याच्यावर उपाय कुणी करायचे? ---आपणच ना?
आपल्यापुढे आदर्श भरपूर आहेत. त्यांना अनुसरण्यासाठी मनाचे दरवाजे उघडणार कोण?—आपणच ना?

डॉ प्रभा अत्रे


Comments