म्हणे महिला दिन!
- jayashreedesaii

- Jul 31, 2020
- 1 min read
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे....माझा दिवस ....
पण मी म्हणजे कोण आहे ?
माझी ओळख काय आहे? कुणाची तरी मुलगी , कुणाची तरी बायको , कुणाची तरी आई ...इतकीच?
मला काय आवडत? मला काय हवंय?
स्त्रियांचा किती विकास झालाय याची आकडेवारी?
स्त्रियांचं अजून किती व कुठे शोषण होतंय याच्या भेदक कहाण्या?
स्त्रियांचे गोडवे गाणारे प्रासंगिक लेख की त्यांच्या वरील अत्याचाराबद्दल ढाळलेले नक्राश्रू?
कुठे तरी कुणी तरी दिलेले गुलाब वा पुष्प गुच्छ? काही संस्थांनी दिलेले सांकेतिक पुरस्कार? स्वतःचा बिझिनेस वाढवण्यासाठी देण्यात येणाऱ्या खास ऑफर्स?
त्याने माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे?
अजून किती काळ माझ्यासाठी करायचं ते असं सांकेतिकच राहणार आहे?
सीतेला अग्नी परीक्षा द्यायला लागली ...किती काळ लोटला त्याला? आजही घरी-दारी तिचीच अग्निपरीक्षा? तिनेच सतत स्वतःला सिद्ध करत राहायचे ?
अजून किती काळ तिच्या वाट्याला फक्त तोंड देखली गोड गोड सुभाषितं आणि प्रत्यक्षात स्त्री भ्रूण हत्या, कौमार्य चाचणी , सामूहिक बलात्कार, आर्थिक, लैंगिक शोषण हे भेदक वास्तव येणार?
खरं तर हे आता लिहायचाही कंटाळा आलाय. कारण कोणत्याही स्त्रीला यातलं काहीच नको असतं. ती साधी असते.... तिचे आनंद छोटे छोटे असतात. तिच्या माणसांत तिचा आनंद सामावलेला असतो. तिच्या साठी प्रतीकात्मक गोष्टी करून तिच्यासाठी खूप काही केल्याची कृतार्थता बाळगणाऱ्यान खरंच स्त्री कशी असते हे कळलेलं तरी असतं?
हेच विचार मनात आले आणि लिहावसं वाटलं ...स्वतःची ओळख करून द्यावीशी वाटली
स्त्री कशी असते माहित आहे ?
कुणीही स्त्री हेच सांगेल ...
मला हसायला आवडतं
मला हसवायला आवडतं
मनातलं दुःख मनात
लपवायला आवडतं ...
मला झुरायला आवडतं
मला झरायला आवडतं
एक एक पाकळी टाकत
पुन्हा फुलायला आवडतं.....
प्रेमात भिजायला आवडतं
मला भिजवायला आवडतं
इवलासा कोंब होऊन
पुन्हा रुजायला आवडतं....
मला जगायला आवडतं
मला जगवायला आवडतं
भूमीचे हात होऊन
आभाळ गाठायला आवडतं ....


Comments