top of page
Search

पिसाटलेला पाऊस!

  • Writer: jayashreedesaii
    jayashreedesaii
  • Jul 31, 2020
  • 2 min read


©जयश्री देसाई

त्याचं कौतुक करावं की त्याला शिव्या घालाव्या?

त्याने फुलवलेली हिरवीगार वनश्री आणि फेसाळ धबधबे नजरेत भरून घ्यावे की त्याने जो उग्र थयथयाट मांडलाय त्यानं भयकंपित व्हावं?

अर्थात, आत्ता तरी भीतीची जाणीवच जास्त आहे. ठिकठिकाणी उद्भवलेली पूर स्थिती, धोक्याच्या पातळीवरून वाहणाऱ्या नद्या, लोकांच्या घरात शिरलेलं पाणी, वाहून जाणारी जनावरं, कोसळणाऱ्या दरडी, जुने वाडे, बंद पडलेली रेल्वे, रस्ते वाहतूक, पाण्यात बुडालेली व वाहून जाणारी वाहनं, रेल्वे व रस्त्यांवर पडलेल्या दरडी, डोंगरांना, पुलांना व महामार्गांना पडलेल्या मोठमोठ्या भेगा, ठिकठिकाणी अडकून पडलेली माणसं, बुडालेले मंदिरांचे कळस .....खरोखर बातम्या बघाव्याशा वाटत नाहीत इतकी ही दृश्यं थरकाप उडवणारी आहेत...

‘नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी’ या कवयित्री इंदिरा संत यांच्या ओळी सतत आठवाव्यात अशी ही स्थिती आहे.

नको नाचू तडातडा असा कौलारावरून

तांबे-सतेली-पातेली आणू भांडी मी कोठून ...

असंही त्यांनी या कवितेत पावसाला विचारलंय...पण आज परिस्थिती अशी आहे की तांबे, सतेली, पातेल्यांसकट अवघे संसार वाहून गेलेत... जो यावा म्हणून आपण डोळ्यात पाणी आणून आस लावून बसलो होतो, तोच आता डोळ्यातलं पाणी थांबू देत नाहीय...जो आपल्याला हवासा होता, तोच आता नकोसा झालाय. मना-मनात हिरवाई फुलवणारा रोमँटीक, हळवा श्रावण, आज श्रावणात आपण ज्याला पुजतो त्या शंभू महादेवाचं स्मशान वैराग्य धारण करून बसलाय...

त्याचं हे उग्र रूप भीषण आहे.

पण मनात सहज विचार आला की, आपलं पण कसं आहे नं? आपल्याला आस असते किंवा पेलवतं ते सौम्य, हळवं रूपच! उग्र रूप, संतापी स्वभाव, विनाशाची वृत्ती आपल्याला आवडत नाही, झेपत नाही... मग ती माणसाची असो वा निसर्गाची ....माझी आई लहानपणी सांगायची हसत राहा. दुःख वाट्याला आलं तरी ते मनात लपवून हसत राहा. आनंद वाट. रडत बसलीस, कुढत बसलीस, चिडत बसलीस तर तू एकटीच असशील...एकटीच पडशील....त्यामुळे आनंद वाटावा जनात, दुःख ठेवावं मनात....आज पावसाचं थैमान, त्याचं उग्र रूप, त्याला मिळत असलेली दूषणं बघून तेच आठवत होतं...

आपल्याला पावसाचं सृजन हवं असतं, त्याचं हळुवार रूप आपल्याला पसंत असतं, त्याच्या स्पर्शाने धरेचं सुखावलेलं रूप आपल्याला प्रिय असतं, त्याच्या साक्षीने फुलणारा शृंगार आपल्याला हवा असतो. मात्र तो असा पिसाटल्यासारखा वागायला लागला, आपली घरं दारं, शेतं वाहून न्यायला लागला की अक्षरशः आपल्या पायाखालची जमीन सरकते. आपण त्याला शिव्या घालतो. कविवर्य विठ्ठल वाघांच्या शब्दात,

‘निदान पावसाने तरी अशा वेळेला असे काही करू नये,

साऱ्यांनीच मारलेल्या सीझरवर निदान ब्रूटसने तरी वर करू नयेत’

अशी अपेक्षा व्यक्त करायला लागतो.

त्यांनी हे कोरड्या दुष्काळाच्या संदर्भात म्हटलं होतं. आज ओल्या दुष्काळाच्या संदर्भात तेच म्हणायची वेळ आली आहे.

पण हे म्हणताना तो ब्रूटस आपल्याही मनात दडलेला आहेच, याचं भान आपल्याला राहातं? हे पिसाटलेपण, हा उन्माद, हा संताप आपणही अनेकदा दाखवतो हे आपल्या लक्षात तरी येतं? तो उग्र चेहरा अनेकदा आपलाही असतो हे आपण कधी आरशात बघून लक्षात घेतो?

विठ्ठल वाघांच्या त्या कवितेतली शेवटची ओळ आहे,

निसर्गा हे [अ]मानुषपण घेऊन, तू तरी माणसांना कुस्करु नये...

ही ओळ वाचतानाही खेद होतो. कारण निसर्ग असा अमानुषपणा करतो तेव्हा त्यालाही आपला अमानुषपणा जबाबदार असतो हे आपण लक्षातच घेत नाही. आपणही संवेदनांची होळी करून अमानुषतेचा मुखवटा धारण केलाय हे आपल्या लक्षातही येत नाही ....पावसाला कशाला बिचाऱ्याला दोष द्यायचा?

स्वतःच्या पायाखाली काय जळतंय हे न बघता दुसऱ्याला दोष देणं ही सवयच लावून घेतलीय नं आपण! त्याला काय करणार?

--------------------------

 
 
 

Recent Posts

See All
३ शतकांचा वनवास संपत आला !

अयोध्येतील सुवर्ण क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे ....रामाचा आधुनिक वनवास संपायचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. सारी अयोध्या एखाद्या...

 
 
 
स्वप्नपूर्तीच्या दिशेने!

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी नेत्रदीपक रोषणाईने नटलेली, आकर्षक भित्ती चित्रांनी सजलेली अयोध्या बघताना मन नकळत भूत काळात...

 
 
 
अरेरे!

शिवसेनेची आज कीव येते आहे! आधी राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेस पुढे, त्यांच्या इटालियन नेतृत्वापुढे सरकार स्थापनेसाठी...

 
 
 

Comments


bottom of page