top of page
Search

पाय कोणते व डोकं कोणतं?

  • Writer: jayashreedesaii
    jayashreedesaii
  • Jul 31, 2020
  • 2 min read


दक्षिणेतील प्रख्यात संत रमण महर्षी हे माझे खूप आवडते संत आहेत. त्यांचे विचार म्हणजे बुद्धीला खाद्य असतं.आपल्यालाच आपल्या खोल अंतरंगात उतरायला त्यांचे विचार खूप मदत करतात.

त्यांचा एक प्रसिद्ध किस्सा आहे.

एकदा त्यांचा एक भक्त त्यांच्यापाशी गेला आणि त्यांना म्हणाला, ‘स्वामी, माझी एकच इच्छा आहे. मला तुमच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करायचा आहे. मला कृपया तशी परवानगी द्या’

रमण महर्षी म्हणाले, ‘अरे वा ... फारच चांगली इच्छा आहे तुझी. पण पाय कुठले व डोकं कुठलं?

तो भक्त निरुत्तर झाला.

महर्षींनी थोड्या वेळ त्याच्याकडून उत्तराची प्रतीक्षा केली आणि म्हणाले, ‘जिथे आपला ‘स्व’ किंवा ‘मी’पणा विलीन होतो ते असतात पाय.

त्यावर त्या भक्ताने पुन्हा विचारले, ‘ते पाय कुठे असतात मग?’

महर्षी म्हणाले, ‘कुठे? ते आपल्या आतच असतात’

‘आता सांगा डोकं कुठलं असतं?’

पुन्हा सगळेच भक्त निरुत्तर झाले.

त्यावर महर्षी म्हणाले, ‘आपला ‘अहं’, आपला ‘इगो’ म्हणजे असतं डोकं. ते आपल्या अंतरात असलेल्या श्री चरणांशी विलीन करणं हा असतो नमस्कार. गुरुचे चरण ते असतात! त्यामुळे नमस्कार करायचा तर असा करा!’

हे सांगणं अर्थातच खूप सोपं आहे आणि करणं तेवढंच कठीण. पण ते कसं साधायचं हेही त्यांनी वारंवार सांगितलंय.

आता ‘मला राग येतो’ म्हणजे यातला ‘मी’ कोण? कुणाला राग येतो? शरीराला? मनाला? नेमका कशाला? मनाला असेल तर मन कुठे आहे? कुणी बघितलंय? मग ज्याचं अस्तित्व दाखवताच येत नाही त्याला राग येतो या म्हणण्याला काय अर्थ आहे?

असं करत एक एक पायरी उतरत उतरत आपण आपल्याच अंतरंगातल्या त्या श्री चरणांपाशी येऊन पोहोचतो, तो पर्यंत अर्थातच आपला अहं विलीन झालेला असतो, व्हायला हवा.

ते सांगतात, ‘नियतीला, प्रारब्धाला जिंकण्याचे व त्यापासून मुक्त होण्याचे दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे ती कुणाची नियती आहे याचा खोलवर जाऊन शोध घ्या. तुमच्या लक्षात येईल, की ती नियती तुमची नाही. ती तुमच्या ‘अहं’शी बांधली गेली आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे त्या नियंत्याला, त्या आत्मस्वरूपाला पूर्णपणे शरण जाणे. आपण त्या देवाला पूर्णपणे शरण गेलो आहोत, त्याला वाहून घेतलं आहे असं आपल्याला कितीही वाटत असलं तरी जो पर्यंत त्याच्याकडे काही तरी, भले तो मोक्ष असेल ...पण तो मागण्याइतका दुजाभाव आपल्यामध्ये शिल्लक राहतो, तो पर्यंत त्याला संपूर्ण शरण जाणे नाही म्हणता येणार. हे म्हणजे साखरेच्या दाण्यांपासून बनवलेल्या मूर्तीतलीच काही साखर काढून घेऊन ती त्यालाच अर्पण करण्यासारखं आहे. त्याचंच त्याला अर्पण करताना आपण विनाकारण आपला ‘अहं’ कुरवाळत बसतो आहोत, कर्तेपणा आपल्याकडे घेतो आहोत. तुम्ही असं म्हणता की मी माझं तन- मन- धन तुला अर्पण केलं आहे, तेव्हा ते तन -मन -धन तुमचं असतं? जे त्याचं आहे, त्यानेच दिलेलं आहे ते त्यालाच अर्पण काय करणार?

थोडक्यात सांगायचं तर हा ‘मी’पणाचा शोध आहे. ‘कोहं’चा शोध आहे. तो ‘सोहं’पाशी येईपर्यंत साधना करायचीय ती अशी!

जमेल आपल्याला?

सोप्या वाटणाऱ्या गोष्टीच खूप कठीण असतात ना?

 
 
 

Recent Posts

See All
३ शतकांचा वनवास संपत आला !

अयोध्येतील सुवर्ण क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे ....रामाचा आधुनिक वनवास संपायचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. सारी अयोध्या एखाद्या...

 
 
 
स्वप्नपूर्तीच्या दिशेने!

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी नेत्रदीपक रोषणाईने नटलेली, आकर्षक भित्ती चित्रांनी सजलेली अयोध्या बघताना मन नकळत भूत काळात...

 
 
 
अरेरे!

शिवसेनेची आज कीव येते आहे! आधी राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेस पुढे, त्यांच्या इटालियन नेतृत्वापुढे सरकार स्थापनेसाठी...

 
 
 

Comments


bottom of page