पुत्र अमृताचे !
- jayashreedesaii

- Jul 31, 2020
- 3 min read
काल रात्रीचा अवघ्या २ किमीचा व फक्त २९ सेकंदांचा खेळ खूप काही शिकवून गेला. हाता तोंडाशी आलेलं यश हुकलं, साप शिडीच्या खेळाप्रमाणे शिडीवरून वर जाता जाता आपण सापाच्या तोंडात जाऊन पडल्यासारखे आशेच्या हिंदोळ्यावरून दाणकन खाली आपटलो. हसरे चेहेरे आणि टाळ्यांच्या कडकडाटाची जागा उदास मौनाने घेतली. दिवस-रात्रीची मेहेनत एका क्षणात होत्याची नव्हती झाली. इस्रोचे प्रमुख डॉ शिवान यांचा चेहेरा तर बघवत नव्हता. पंत प्रधानांचा चेहरा धीरगंभीर होता. तर हा ऐतिहासिक क्षण टिपण्यासाठी देशभरातून तिथे जमलेल्या मुलांचे चेहेरे तसेच उत्साही होते, कुतूहलाने परिपूर्ण होते.
ती मुलं म्हणजे उद्याची आशा होती आणि ती तशीच उत्फुल्ल होती...रात्री दीड -दोन वाजताही....केवळ या एका प्रकल्पाचीच नव्हे तर संपूर्ण देशाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते पंतप्रधान स्थितप्रद्न्य होते..एखाद्या योग्यासारखे....त्या क्षणी त्या हतबल वैज्ञानिकांना धीर देण्यासाठी ते जणू त्यांचे पिता झाले होते आणि कधी शेरोशायरीचा तर कधी शब्दांचा-देहबोलीचा आधार घेत ते तिथल्या प्रत्येकाला आश्वस्त करत होते. काल रात्री जागल्यानंतर आज सकाळीही! ते अवघ्या देशाचे प्रतिनिधित्व करत होते. ‘वय अमृतम पुत्रस्य’ असं म्हणत ते ‘आपण अमृताचे पुत्र आहोत’ असं सांगत विझलेल्या मनांना पुन्हा उभारी देत होते आणि खेळाच्या मॅचेस बघण्यासाठी रात्री जागवणारा हा देश आपल्या वैज्ञानिकांचा पराक्रम बघण्यासाठी काल जागत होता. अवघा देश एक झाला होता. इस्रो त्या हतबल क्षणी एकटी नव्हती. आपल्यापैकी प्रत्येक जण ...मग तो सुशिक्षित असो वा अशिक्षित, इस्रोच्या बरोबर होता! हा एकत्वाचा काल घडलेला साक्षात्कार अभूतपूर्व होता. निसर्गाने त्याची ताकद दाखवून दिली असली, तो अजेय आहे याची जाणीव दिली असली तरी साऱ्या भारताची ताकद त्या क्षणी ताठ मानेने इस्रोच्या सोबत उभी होती
ए चाँद तू इतना ना इतरा,
नापी है हमने दूरी, अब आसमाँ हमारा
असा निर्धार प्रकट करत होती
तिथे भावनांचे दर्शन होते, एकाग्रतेचे दर्शन होते, हातातून खेळ निसटला आहे हे लक्षात आल्यानंतरही आशेने मॉनिटरवर खिळलेले डोळे आशा अमर आहे हा संदेश देत होते, तर काही पत्रकार तिथेच व काही तथाकथित विचारवंत बाहेर इस्रोला, इस्रोचे प्रमुख डॉ सिवान यांना धारेवर धरत होते. डॉ सिवान यांच्या डोळ्यातील अश्रू हा त्यांना दुर्बलपणा वाटत होता, पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं केलेलं सांत्वन, त्यांना दिलेला धीर हा त्यांना पब्लिसिटी स्टंट वाटत होता ...एकीकडे घडत असलेला एकीचा, राष्ट्रीय अस्मितेचा साक्षात्कार हा जितका विलोभनीय होता, सुखद होता तितकाच हा विकृत चेहेरा खेदजनक होता. जो ‘स्लीपलेस सायंटीस्ट’ म्हणून ओळखला जातो, साठी उलटल्यानंतरही इस्रोला व देशाला अवकाश क्षेत्रात सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवण्याची महत्वाकांक्षा बाळगतो त्याला एखाद्या क्षणी निराशा, वैफल्य येऊ शकत नाही? त्याला दुःख होऊ शकत नाही? आश्वासक भूमिकेत तिथे वावरत असलेल्या पंतप्रधानांच्या समोर ते अश्रू प्रकट झाले तर तो दुर्बल ठरतो? एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा दुर्बल होता म्हणून सर्वोच्च स्थानी पोहोचला? त्या क्षणी त्यांचे अश्रू प्रकट झाले, ते भावविवश झाले याचा अर्थ त्यांनी कायमचे हात पाय गाळले?
मला व माझ्या सारख्या असंख्यांना तोच क्षण सर्वोच्च बिंदू वाटला. एक सामान्य चहा विक्रेता मुलगा आणि एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा यांची ती गळा भेट मला खरोखरच खूप मनोद्न्य वाटली. भारतीय लोकशाहीचीच नव्हे तर भारतीय संस्कृतीची ओळख वाटली आणि त्याला जर पंतप्रधानांचा पब्लिसिटी स्टंट म्हणायचंच असेल तर मग माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंतराळवीर राकेश शर्मा याच्याशी तो अंतराळात असताना केलेली बातचीत, व त्याचा केला गेलेला उदो उदो हाही पब्लिसिटी स्टंट होता असेच म्हणायचे का? की त्या वेळी त्या देशाचं प्रतिनिधित्व करत होत्या म्हणून गोडवे गायचे आणि आता मोदी जे करतात त्या प्रत्येकच गोष्टीला निवडणुकीच्या दृष्टीने केलेला पब्लिसिटी स्टंट ठरवायचे? मनात असाही विचार आला की तिथे मोदींच्या जागी नेहरू किंवा अगदी सोनिया गांधी असत्या तर आज जे टीका करतायत त्यांनी काय म्हटलं असतं? असे भेद हेही समाजाला घातकच. तेही अशा वेळी सुद्धा उफाळून यावेत याचा खेद झाला.
परिस्थितीची नजाकत समजण्याची पात्रताच काही जण गमावून बसलेत की काय अशी शंका आता यायला लागली आहे.
खरं तर पंतप्रधान हा देशाचा पालक असतो. तो प्रसंगी कठोर व आवश्यक तेव्हा संवेदनशील असावा लागतो. मोदींनी त्याचा प्रत्यय वारंवार दिला आहे, मग ते पुलवामा असो की कालचा प्रसंग. आजच्या भाषणात त्यांनी ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांच्या कुटुंबियांचंही कौतुक केलं, त्यांना धन्यवाद दिले. ही सर्वोच्च पदावरील व्यक्तीची संवेदनशीलता नव्हती का? त्यांची धोरणं वा त्यांचे राजकारण मान्य नसले तरी या आस्थेचे, संवेदनशीलतेचे स्वागत व्हायला हवे. जिथे ते चुकतील तिथे कठोर टीका व्हायला हवी. यालाच तर लोकशाही म्हणतात. आपण ती मानली पाहिजे.
आपल्या दुर्दैवाने ब्रिटीश जाताना आपल्या मनात गुलामी पेरून गेले. त्यात आपण छिद्रान्वेशी वृत्तीची भर घालून आपलंच नुकसान नको करून घ्यायला! ‘जे जे उन्नत, उदात्त, मंगल, महन्मधुर ते ते..’ याचाच जयजयकार व्हावा.
काल देशभरातून तिथे जमलेल्या मुलांनी मोदींना एक प्रश्न विचारला की असे यश मिळवायचे असेल तर काय करायला हवे? पंतप्रधान मोदी यांनी त्याचं दिलेलं उत्तर त्या मुलांसाठीच नव्हे तर सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे. ते म्हणाले, ‘जो पाया है उसे जोडते जाओ और जो खोया है उसे भूलते जाओ’
ती मुलं व इस्रोचे वैज्ञानिक तर ते लक्षात ठेवून काम करतीलच पण आपणही ते लक्षात ठेवून राष्ट्र शक्तीचा अविष्कार घडवायला हवा. ‘विक्रम’ चंद्रावर नसेल उतरु शकला पण तो मनात उमलायला हवा.
[०७/०९/२०१९]


Comments