...दामन छूट गया!
- jayashreedesaii

- Jul 31, 2020
- 2 min read
प्रख्यात गझल गायिका बेगम अख्तर एकदा म्हणाल्या होत्या, ‘नयापन वही तक मुनासिब है जहाँ तक फनकार नयेपन के चक्कर में तेहजीब का दामन ना छोडे...’
हे त्या संगीताच्या संदर्भात म्हणाल्या होत्या. जे आज फारच प्रकर्षाने जाणवू लागलं आहे. आजच्या बहुतेक गाण्यांमधले शब्द, त्यांच्या चाली बघितल्या तर आपल्या संस्कृतीशी त्यांची नाळ कुठे जोडली गेलेली आहे असं अजिबात जाणवत नाही. पाश्चिमात्य संगीत, पौर्वात्य संगीत पूर्वीचे संगीतकार ऐकत नव्हते असं नाही. त्यातून काहीच उचलत नव्हते असंही नाही. पण त्याचं ते आपल्या शास्त्रीय संगीताच्या आधारे इतकं भारतीयकरण करत होते की ते परदेशी राहातच नव्हतं. ते इथल्याच मातीतून उमलल्यासारखं वाटत होतं. तसं आज होत नाही.
आज सगळीच परिस्थिती बदललीय. केवळ संगीताच्याच बाबतीत नव्हे तर प्रत्येकच बाबतीत आपण आपलं डोकं बाजुला ठेवून पाश्चात्यांचं अंधानुकरण करायला लागलो आहोत असं वाटायला लागलं आहे. पण दुर्दैवाने तेही आपण पूर्णपणे करत नाही. आपण कुठे तरी मध्ये लोंबकळतो आहोत. आपल्याला मुलांना मोकळीक द्यायला आवडते, ते पब्स-पार्ट्या यात रमलेले चालतात, पण पाश्चात्यांप्रमाणे सोळाव्या वर्षी घराबाहेर पडलेले वा डेटिंग करायला लागलेले किंवा मुली चौदाव्या वा सोळाव्या वर्षी गर्भवती राहिलेल्या आपल्याला अर्थातच चालणार नाही. म्हणजेच आपल्याला आपल्या संस्कृतीचा ‘दामन’ पूर्णपणे सोडून द्यायची इच्छा नाहीय आणि ते योग्यही आहे. पण आपलं वागणं तसं आहे का? मुलांना मित्रासारखं वागवताना त्यांच्या व आपल्या नात्यांतल्या मर्यादांचं भान आपण त्यांना शिकवलं आहे का किंवा ठेवलं आहे का? आजकाल मुलंच नव्हे तर मुलीही सर्रास दारू पिताना, सिगारेट ओढताना दिसतात, अनेक ठिकाणी तर मुलं [त्यात मुली आल्याच] मोठी झाल्यावर आई- वडीलच त्यांच्या ग्लासात दारू ओतून ‘चिअर्स’ करताना दिसतात....मुलं आणि पालक यांच्यातला संवाद तर संपलेलाच आहे ...गुरु हा पूजनीय असतो हे भानही आता संपलेलं आहे. आपल्याला हे नवेपण, ही आधुनिकता हवी होती का?
परवा प्रख्यात डॉक्टर व विशेषतः ‘एडस’ या विषयावर आयुष्यभर काम करत आलेल्या तद्न्य, डॉ. रेखा डावर एका भाषणात म्हणाल्या की आता आपल्या मुलांना नवीन ए. बी. सी. शिकवायची वेळ आली आहे. ‘ए’ म्हणजे ‘अॅबस्टीनन्स’, लग्न होईपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन, ‘बी’ म्हणजे ‘बी फेथफुल’....म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करताच येत नसेल तर निदान एकाच पार्टनरबरोबर ‘फेथफुल’ म्हणजे एकनिष्ठ राहा आणि ‘सी’ म्हणजे तेही शक्य नसेल तर किमान कंडोम वापरा. ही नवी बाराखडी मुलांना येत नाही त्यामुळे आज दुर्दैवाने मध्यम वर्गीय व उच्च मध्यम वर्गीय मुलांमध्ये सुद्धा एडसचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्या म्हणाल्या मी ८८-८९ साली अमेरिकेतून भारतात परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा भारतात एडसची फक्त पहिली केस आढळून आली होती. मला वाटत होतं की भारतातली देवभोळी, पापभीरू मानसिकता, मजबूत कुटुंब व्यवस्था यामुळे आपल्याला भारतात या रोगावर बिल्कुल काम करावं लागणार नाही. पण माझी हयात गेली तरी मी त्याच रोगावर काम करतेय आणि त्याचं प्रमाण भयावह रीतीने वाढतंय....
तेहजीब का दामन हाथ से बुरी तरह छूट गया.....
नवेपणाच्या भ्रामक जाळ्यात स्वतःला अडकवून घेताना आपण संस्कारांचा धागा, संस्कृतीशी असलेली नाळ स्वतःच तोडून टाकली...त्याचे भीषण परिणाम आपण भोगतोय!
बेगम अख्तर जे म्हणाल्या ते फक्त संगीतालाच लागू नव्हतं...... पण आपल्याला ते उमजलं नाही!


Comments