तेथे कर माझे जुळती!
- jayashreedesaii

- Jul 31, 2020
- 3 min read
आज कविवर्य बा. भ बोरकरांचा जन्मदिन ! ‘तेथे कर माझे जुळती’, ‘सरीवर सरी आल्या ग’ सारख्या असंख्य सुंदर कविता लिहिणारे , गोव्यातील निसर्गात रमलेले आणि तो आपल्या पुढे आपल्या शब्दांतून उभे करणारे बा भ म्हणजेच बाकीबाबू बोरकर आज आपल्यात नाहीत. पण त्यांना फार जवळून बघण्याचं , त्यांच्या कविता ऐकण्याचं भाग्य मला मिळालं. त्यांचा मोठेपणा.... ते काय, मंगेश पाडगावकर काय या अभिजात कवींची अभिजातता आपल्यापर्यंत पोहोचवावी व कवितली करूणा काय असते हेही मांडावं असं प्रकर्षाने वाटलं म्हणून ही पोस्ट. माझे वडील कै प्रभाकर अत्रे हे नामवंत साहित्यिक. डोंबिवलीतील अनेक साहित्यिक -सांस्कृतिक चळवळींचे संस्थापक --–आधारस्तंभ. डोंबिवलीत त्यांनी व अन्य काही कवींनी काव्य रसिक मंडळ काढलं [ ते अजूनही चालू आहे ] त्याच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने बहुतेक सर्व मोठे कवी -कवयित्री डोंबिवलीत येऊन गेले . बरेच जण आमच्याच घरी मुक्कामाला राहिले. बाकीबाबू हे त्या पैकीच एक. ते आले तेव्हा शाळकरी विद्यार्थिनी असलेली मी गालगुंडाने आजारी होते . तापाने फणफणले होते. माझी आई कै सौ सुधा अत्रे ही खऱ्या अर्थाने सुगृहिणी. आम्ही तर सोडाच पण अगदी ती जरी आजारी असली तरी आमच्या घरून कुणी विन्मुख गेलं नाही. तिच्या या स्वभावानुसार तिने त्यांचंही भरपूर आदरातिथ्य केलं. ते जेऊन कार्यक्रमाला गेले. मी आजारी असल्याने मला सोडून आई जाऊ शकत नव्हती. त्यामुळे ती खंतावली पण इलाज नव्हता. बाकी बाबूंना हे दिसत होतं. त्यांचं मोठेपण हे की ते कार्यक्रमाला गेले. तो छान पार पडला. घरी आल्यावर जेवणे झाली आणि दिवसभर थकलेले असतानाही त्यांनी केवळ एकट्या आईसाठी म्हणून तिथे केलेला संपूर्ण कविता वाचनाचा कार्यक्रम घरी केला. श्रोते फक्त आई -बाबा, तापामुळे अर्धवट ग्लानीत असलेली मी व माझा भाऊ अजय... रात्र झाल्याने तोही झोपूनच गेला होता... मी त्यांच्या कविता समजण्याएवढी मोठी नव्हते, बरीही नव्हते. पण त्यांची ती एका विशिष्ट लयीत कविता म्हणण्याची पद्धत, पांढरेशुभ्र कपडे व हाताला बांधलेला गजरा यांचा ठसा माझ्या मनावर उमटला तो कायमचाच. ही कवीची करुणा! त्याची अभिजातता ! त्यांची आणखी एक आठवण बाबा सांगायचे .आज प्रख्यात कवी श्री प्रवीण दवणे यांच्याशी बोलतानाही ती निघाली . बोरकरांनी त्यांच्या उमेदवारीच्या काळात त्यांची एक कविता कविवर्य भा रा तांबे यांना दाखवली . बोरकरांच्या अनेक कवितांत निळाईचा उल्लेख असतो. त्या कवितेतही होता. ती ऐकून तांबे म्हणाले, कविता छान आहे. फक्त त्यात निळी शाई फारच पडलीय ‘---बोरकर ही आठवण मुलाखतीतूनही सांगायचे. स्वतःवरची टीका सांगण्याइतकी दिलदारीही त्यांच्याकडे होती! आज गटा तटाचे राजकारण करणाऱ्या किती कवी- साहित्यिकांकडे ही अभिजातता , दिलदारी दिसते? हे त्या काळच्या सर्वच कवी – साहित्यिकांकडे होतं. असंच कधी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या आठवणी सांगीन तेही तसेच ! प्रवीण दवणे सांगत होते , कविवर्य मंगेश पाडगावकर ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी आधी ते दवणे यांच्या घरी गेले . पण दवणे यांच्या मातोश्रींचे गुडघे दुखत असल्याने त्या पाडगावकरांच्या कार्यक्रमाला जाऊ शकल्या नाहीत . तर हा कविश्रेष्ठ कार्यक्रम संपल्यावर पुन्हा दवणे यांच्या घरी गेला . त्यांनी दवणेंच्या मातोश्रींना कविता ऐकवल्या आणि मग ते रवाना झाले आज देवी शारदेच्या दरबारातील या तिच्या लाडक्या पुत्रांची नवे निघाली तरी या अशाच असंख्य आठवणी जाग्या होतात. ओठांवर त्यांचेच शब्द उमटतात...तेथे कर माझे जुळती ! त्यांची मला आवडणारी एक अप्रतिम कविता द्यायचाही मोह आवरत नाहीय ! देखणे ते चेहेरे, जे प्रांजळाचे आरसे गोरटे की सावळे, या न मोल फारसे [१] तेचि डोळे देखणे, जे कोंडिती साऱ्या नभा वोळिती दु: खे जनांच्या, सांडिती नेत्रप्रभा [२] देखणे ते ओठ की जे, ओविती मुक्ताफळे आणि ज्यांच्या लाघवाने, सत्य होते कोवळे [३] देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे [४] देखणी ती पाउले, जी ध्यासपंथे चालती वाळवंटातूनसुध्दा, स्वस्तिपद्मे रेखिती [५] देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेती स्वेच्छया लाभला आदेश प्राणा, निश्चये पाळावया [६] देखणी ती जीवने, जी तृप्तिची तीर्थोदके चांदणे त्यातून वाहे, शुभ्र पाऱ्यासारखे [७] देखणा देहांत तो, जो सागरी सूर्यास्तसा अग्निचा पेरून जातो, रात्रगर्भी वारसा [८]
त्यांचा देहांतही असाच देखणा होता नाही?


Comments