जग खारूताईचं!
- jayashreedesaii

- Jul 31, 2020
- 2 min read
©जयश्री देसाई
फेसबुक हे खरोखरच अफाट असं मायाजाल आहे. छान छान फोटो, छान छान व्हिडिओज, वेगवेगळ्या विषयांवरची माहिती या सगळ्यामुळे फेसबुकची वॉल ही निर्जीव भिंत न राहता, सजीव, चैतन्यमयी भिंत झाली आहे. इथे प्रत्येकच गोष्टीला जिवंत प्रतिसाद आहे. मग ते तुम्ही लिहिलेलं एखाद स्फुट असो, वा कुणाचा वाढदिवस किंवा परीक्षेतलं यश.... आपल्या प्रत्यक्ष ओळखीच्या नसलेल्या, पण फेसबुक फ्रेंड असलेल्या व्यक्तीलाही आपण शुभेच्छा देतो, त्याच्या आनंदात आणि दुःखात सहभागी होतो....नकळतपणे, आपण सध्या अभावानेच प्रत्यक्षात दिसणारं ‘शेअरिंग आणि केअरिंग’ व्हर्च्युअल जगात तरी करतो. म्हणजे त्या व्हर्च्युअल जगावरही आपण आपल्या मनातल्या माणुसकीचं सिंचन करतो असं मला वाटतं.
या व्हर्च्युअल जगातच अनेकदा काही आनंदाचे कोपरे सापडतात. कधी ते एखाद्या व्हिडीओच्या रूपाने सापडतात तर कधी काही फोटोंच्या. मनावरची सारी मरगळ ते पुसून टाकतात. मलाही अलीकडेच असाच एक छानसा आनंदाचा कोपरा सापडलाय. खरं तर त्याचं शब्दात वर्णन करणं कठीण. तो प्रत्यक्षच बघण्याचा विषय आहे. पण त्याच्याविषयी सांगतानाही मला खूप आनंदाचा अनुभव येतोय. तो आनंद सगळ्यांना वाटावा असं मला वाटतंय.
या आनंदाचं कारण ठरल्या आहेत चिमुकल्या खारुताई आणि त्या करत असलेली धमाल.
एक जागतिक ख्यातीचे निसर्ग फोटोग्राफर आहेत गीर्टन वेगेन नावाचे. गेली कित्येक वर्षं ते जंगली खारी आणि पक्षी यांचाच मागोवा घेत, फोटो काढत जगभर फिरतायत. २०१३ साली ते पूर्ण वेळ फोटोग्राफर बनले आणि तेव्हापासून जंगली खारींचं सुंदर, विक्षिप्त जग टिपायचा ध्यास घेऊनच ते काम करतायत. त्यांनी काढलेले ३० सुंदर फोटो फेसबुकवर बघायला मिळाले. आता रोज एकदा तरी ते बघितल्याशिवाय चैनच पडत नाहीय.
खार हा तसा भित्रा प्राणी. ती अगदी खिडकीत किंवा गॅलरीत आली तरी पटकन पळून जाते हा आपला अनुभव. पण गीर्टननी या खारूताईंशीच दोस्ती केली. ही दोस्ती इतकी अतूट आहे की आता त्या बिनधास्तपणे त्याच्या अंगा खांद्यावर बागडतात. त्यांनी लपवलेल्या बियांनीच आज त्याच्या परसात मस्त फुलबागही फुललीय. तिथे त्याने काढलेले खारूताईंचे फोटो आज जगभर लोकप्रिय झालेत आणि खरोखरच काय सुंदर फोटो आणि सुंदर जग आहे या खारूताईंचं. कधी त्या फुलांत तोंड खुपसून त्यात दडलेले पराग कण किंवा बिया वेचताना दिसतात, कधी त्यांनीच अप्रत्यक्षपणे लावलेल्या सूर्य फुलांच्या दोन दांड्यांवर दोन हात व दोन पायांच्या सहाय्याने उभ्या राहिलेल्या दिसतात... कधी बेरीच्या झाडांवर रंगलेली त्यांची मिटिंग दिसते तर कधी त्या मश्रुमच्या छताखाली किंवा एखाद्या मोठ्या फुलाच्या छत्रीखाली निवांत विसावलेल्या दिसतात. हे त्यांचे सारेच विभ्रम इतके गोड आहेत की ते बघताना वेडच लागतं...मनात येतं, त्यांना आपल्या इतकी बुद्धी नसेल, पण तरीही त्यांच्या इवल्याशा विश्वात अगदी लहान लहान गोष्टींतून त्यांनी शोधलेला, फुलवलेला आनंद किती मोठा आहे....आपल्यालाही असाच अगदी लहान सहान, आपल्या आजुबाजूच्या गोष्टींतून आनंद शोधता आला तर?
नव्हे तो यायलाच हवा
मग त्या इवल्याशा जिवांनी गीर्टनच्या परसात फुलवलीय तशी फुलबाग आपल्याच मनात फुलवणं आपल्यालाही सहज शक्य आहे ... नाही का?


Comments