जंगलाचा आवाज !
- jayashreedesaii

- Jul 31, 2020
- 2 min read
परवा फेसबुकवर एक छान व्हिडियो बघितला. एक जंगलाचं वरून केलेलं चित्रण होतं ते. ‘वरून पाहिलेलं आणि ऐकलेलं जंगल’ अशी त्याची थीम होती. मला तो इतका आवडला की मी तो माझ्या वॉलवर शेअरही केला. अनेकदा बघितला, पण तरीही प्रत्येक वेळी तो मला वेगळ्याच सौंदर्यानिशी समोर आला..येतोय. तो पहिल्यांदा बघितला तेव्हा जशी मी मुग्ध, निःशब्द झाले होते तशीच आताही होतेय.
खरं तर तो १-२ मिनिटाचा व्हिडियो आहे. त्यात त्या जंगलातल्या वेगवेगळ्या झाडांचे शेंडे मजेत झुलताना दिसतायत. जणू एकमेकांशी बोलतायत. त्यांचे रंग वेगळे, त्यांची जातकुळी वेगळी, पण त्यांच्या अशा झुलाण्याने, एकमेकांवर आपटण्याने जे पॅटर्नस तयार होतायत ते बघताना भान हरपतंय. हा व्हिडियो जितका मला प्रेक्षणीय वाटतोय तितकाच तो श्रवणीय सुद्धा आहे. कारण त्या पानांची सळसळ, त्या घनदाट जंगलात वाऱ्याच्या घुमण्याचा आवाज, पक्ष्यांचे आवाज हे सगळं इतकं छान आहे की आपण त्यात हरवून जातो. मला वेळ मिळेल तेव्हा मी तो बघतेय ...असं वाटतं की जणू ती झाडं एकमेकांशी बोलतायत...बोलत असतील का? बोलत असतील तर काय बोलत असतील? त्यांना पण आपल्यासारखी त्यांची अशी काही सुखं-दुःखं असतील का? त्यांना पण एखाद्या पाखराने त्यांच्या अंगा- खांद्यावर घरटं बांधलं तर आनंद होत असेल का? व ते घरटं मोडलं तर त्याचं दुःख? वाऱ्या—पावसाने त्यापैकी एखाद्या झाडाची एखादी फांदी तुटली तर त्या झाडालाही होत असतील का वेदना? आपल्या सारख्याच? एखादं झाड मेलं वा तोडलं गेलं तर त्यांच्यातही भरत असेल का एखादी शोक सभा?
मी लहानपणी प्रचंड पुस्तकं वाचली आहेत. तेच माझं जग होतं. त्यात बाल साहित्य जसं होतं तशीच इतरही पुस्तकं असायची. त्यात मला पऱ्या भेटायच्या, त्यातल्या झाडांवर वनदेवी राहायच्या.. आई सांगायची रात्री झाडाची पानं तोडू नयेत. ती झाडं व त्या वरच्या वन देवी आणि त्यांची बाळं झोपलेली असतात. तुम्ही चांगलं वागलात तर तुम्हाला पऱ्या, वनदेवी भेटतात. त्यांची भाषा वेगळी असते. आपल्याला ती समजत नाही, पण त्यांना आपली भाषा समजते.
मी अजुनही त्या पऱ्या व वन देवींना शोधतेय. माझ्या मनातलं त्यांचं घर अजुनही तसंच आहे. पण त्यांचं खरं घर त्या जंगलात असेल का? त्या नांदत असतील का तिथे? झुलत असतील का त्या झाडांच्या फांद्यांवर?
पुढे मोठी झाल्यावर अध्यात्मिक पुस्तकं वाचली. त्यात वृक्ष -लतांची, पशु -पक्ष्यांची भाषा समजणारे सिद्ध भेटले. मग एकच तीव्र इच्छा मनात निर्माण झाली...की आपल्यालाही ती भाषा यावी!
आज तो व्हिडियो बघताना व त्या जंगलाचा आवाज ऐकताना ती तीव्र इच्छा मनात पुन्हा जागी झालीय ...ती त्या जंगलापर्यंत आणि तिथल्या त्या इवल्या इवल्या पक्ष्यांपर्यंत आणि आपल्याच मस्तीत जगणाऱ्या प्राण्यांपर्यंत पोहोचेल?
बहुदा नाही ...बहुदा कशाला, नक्कीच नाही!
परवा कर्ट इलिसचं ‘ डीप रुट्स ‘ हे पुस्तक पाहिलं.
त्यात वाक्य आहे, ’Tall trees have deep roots. And it takes some time to develop roots, before you grow tall’
आता मुळांपासूनच सुरुवात करायला हवीय!!
सगळ्याचीच!


Comments