top of page
Search

कविता स्वास्थ्यासाठी !

  • Writer: jayashreedesaii
    jayashreedesaii
  • Jul 31, 2020
  • 2 min read

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता

वाहते जिच्यातुनी त्याची जीवन-सरिता….

असं लिहिलंय कविवर्य कुसुमाग्रज यांनी ..त्यांच्या ‘समिधाच सख्या या... ‘ या अत्यंत गाजलेल्या कवितेत!

कवितेचा जीवन प्रवास मांडणाऱ्या या कवितेत ते पुढे म्हणतात,

खडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली

पथ शोधित आली रानातून अकेली,.....

हे सारं आठवायला कारण ठरलं अलीकडेच वाचनात आलेलं एक अद्भुत पुस्तक...’पोएटिक मेडिसिन ...द हिलिंग आर्ट ऑफ पोएम मेकिंग!’

खरं तर कवितेला आपण आपल्याकडे सृजन म्हणतो ...ती सुचते असं म्हणतो ...तो आतून आलेला हुंकार असतो. त्याला प्रतिभा लागते...ते कुणालाही जमत नाही असं आपलं ठाम मत आहे ...पण परदेशात मात्र ‘पोएम रायटिंग’ नाही तर ‘पोएम मेकिंग’ असा शब्द प्रयोग आता अस्तित्वात आलाय आणि हे पोएम मेकिंग चक्क मानसिकच नव्हे तर शारीरिक रोग बरे करण्यासाठीही वापरलं जाऊ लागलं आहे.

त्याच्या मागचं शास्त्र एकदम सोप्पं आहे. जॉन फॉक्स नावाचे पाश्चिमात्य कवी व अधिकृत ‘पोएट्री थेरपीस्ट’ म्हणतात, ‘कवितेमधून तुम्हाला काही सिद्ध करायचं नसतं. कुणाला कसली उत्तरं, स्पष्टीकरणं द्यायची नसतात. तो तुमच्या अंतर्मनाचा कानोसा असतो. तुमच्या आत्म्याचा हुंकार असतो. त्यामुळेच त्याच्यातून तुमच्या अंतरंगाचा नेमका वेध घेता येतो व त्याचाच वापर उपचारासाठी करता येतो. अर्थात यासाठी तुम्ही कवितेच्या तंत्रात तरबेज असायची काही गरज नसते. तुम्ही फक्त व्यक्त होण्याची गरज असते.’

पण हे व्यक्त होणं, शब्दांच्या माध्यमातून मन मोकळं करणं हे सुद्धा किती कठीण असतं ना? कविता लिहिणं तर सोडाच पण आपल्या अगदी जवळच्या माणसांकडेही आपण मन मोकळं करत नाही. त्याची कारणं अनेक असतात. कधी आपल्याला त्यांना दुखवायचं नसतं. कधी आपला अहंकार आड येत असतो. कधी आपण बोलून तरी त्याचा काही उपयोग होईल का याबाबत आपण साशंक असतो. कधी हे आपल्या प्राक्तनाचे भोग म्हणून जे जे वाट्याला येईल ते आपण निमूटपणे स्वीकारलेलं असतं. थोडक्यात काय तर आपल्या साऱ्या खेद -खंती, मान-अपमान, शल्य –वैफल्य आपण मनाच्या कोपऱ्यात, जगापासून दूर दडवून ठेवत असतो. गंमत म्हणजे दुःख, अपमान वगैरे तर आपण सांगत नाहीच, पण आता अशी परिस्थिती आलीय की अनेकदा आपण आपला आनंद ही वाटायला, दुसऱ्याला सांगायला कचरायला लागलोय. कुणी आपल्यावर जळेल का, कुणाची नजर तर लागणार नाही, कुणी ती चांगली बातमी कळली तर आपल्याविरुद्ध षड्यंत्र तर रचणार नाही ना....कुणी त्या आनंदाला नख तर लावणार नाही ना...अशा असंख्य शंका कुशकांनी घेरलं जाऊन आपण अधिकाधिक स्वतःला कोषात मिटून घेत चाललोय....

प्रख्यात शायर गुलझार साहेबांचा एक शेर आहे

जिंदगी युं हुई बसर तन्हा

काफिला साथ और सफर तन्हा

मोबाईल हातात आहे, त्यात सगळे नंबर्सही सेव्ह्ड आहेत पण हक्काने अर्ध्या रात्रीही फोन करावा असा एकही नंबर त्यात नाही...

व्हर्च्युअल फ्रेंड्सची संख्या हजारावर गेलीय, पण एखाद्या व्याकूळ क्षणी ज्याच्या खांद्यावर मान टेकून मनसोक्त रडता यावं असा फ्रेंड एकही नाही...

ही घुसमठ फार मोठी आहे. आज स्पर्धा जितकी जास्त आहे तितकीच! आणि खरोखरच ती आपल्या तब्येतीवर परिणाम करायला लागलीय.....

निदान कवितेतून तरी मोकळं होऊ या? शब्दांनाच सांगाती बनवू या?

जयश्री देसाई

 
 
 

Recent Posts

See All
३ शतकांचा वनवास संपत आला !

अयोध्येतील सुवर्ण क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे ....रामाचा आधुनिक वनवास संपायचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. सारी अयोध्या एखाद्या...

 
 
 
स्वप्नपूर्तीच्या दिशेने!

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी नेत्रदीपक रोषणाईने नटलेली, आकर्षक भित्ती चित्रांनी सजलेली अयोध्या बघताना मन नकळत भूत काळात...

 
 
 
अरेरे!

शिवसेनेची आज कीव येते आहे! आधी राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेस पुढे, त्यांच्या इटालियन नेतृत्वापुढे सरकार स्थापनेसाठी...

 
 
 

Comments


bottom of page