top of page
Search

आनंदाचे डोही आनंद तरंग!

  • Writer: jayashreedesaii
    jayashreedesaii
  • Jul 31, 2020
  • 2 min read

परवाच एके ठिकाणी वाचलं की जालंधरमधील भारतातल्या सर्वात प्राचीन अशा बाबा हरी वल्लभ संगीत महोत्सवाची सांगता आनंदाची शिंपण करणाऱ्या बहार रागाने व्हायची. हुरहूर लावणाऱ्या, आतून कासावीस करणाऱ्या भैरवीने नाही. कारण श्रोत्यांनी जाताना आनंदाचं देणं बरोबर घेऊन जावं हा विचार त्यामागे होता

हा विचार मला इतका आवडला म्हणून सांगू...साध्या साध्या गोष्टी असतात ...पण त्यातून दुसऱ्याला आनंद कसा मिळेल हा विचार आपण खरंच करतो? का फक्त स्वतःच्या आनंदाचा विचार करतो? आणि हा आनंद तरी आपण नेमका कशात मोजतो? पैसे, गाड्या, हॉटेलिंग, युरोप-अमेरिकेची वारी, दागिने, ऐशोरामाच्या महागड्या वस्तू? यात खरंच आनंद मिळतो?---नक्कीच मिळतो. कारण तो आपला ध्यास असतो.

मात्र मला नेहेमी वाटतं की आनंदाचीही प्रतवारी करायला पाहिजे. कारण प्रत्येक आनंदाची जातकुळी वेगळीच असते. काही आनंदही निरागस असतात...लहान मुलांसारखे... तर काही आनंद हे कपडे घालून येतात स्वार्थाचे... दुसऱ्यावर मिळवलेल्या विजयाचे....कपटाचे... स्टेटस सिम्बॉलचे... ते महागडे असतात...त्यांच्यावरचा प्राईस टॅग खूप मोठी कहाणी सांगत असतो ....कधी तो कुणाच्या अश्रूत भिजलेला असतो तर कधी कुणाच्या विझलेल्या, पायदळी तुडवल्या गेलेल्या भावनांच्या थडग्यावर उभा असतो एखाद्या विजयी सम्राटासारखा….कशाचे मोल जास्त मानणार?

‘सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः’ ही प्रार्थना ही आपली, आपल्या संस्कृतीची ओळख आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खायचा ही आपल्याला लहानपणापासून मिळत आलेली शिकवण आहे. ती आपल्या नसा नसात भिनलेली आहे. मग अचानक त्याला छेद जाताना का दिसतोय? घरा घरात स्वार्थ प्रधान होताना का दिसू लागलाय? आणि गंमत म्हणजे स्वार्थाचा इतका पराकोटीचा, विधिनिषेधशून्य विचार करूनही आपण आनंदी आहोत? असू, तर मग का गाठ्ताहेत हृदय विकारासारखी दुखणी तिशी– पस्तिशीत?

खरं तर आनंदी राहाणं कुठे एवढं कठीण आहे? किती आणि काय लागतं आनंदात जगायला?

मायेने वाढलेलं पोटभर सकस अन्न...व्यक्तिमत्वाला उठाव देतील असे साजेसे कपडे ... आरामात राहता येईल एवढ्या गरजेच्या वस्तू..आणि भविष्याचीही चिंता उरणार नाही एवढा पैसा....बाकी खरा आनंद तर लहान सहान, बिन पैशाच्या गोष्टींतच तर जास्त मिळतो.

रात्रीची शांत झोप, सकाळी उठल्यावर कानावर पडणारा पक्ष्यांचा किलबिलाट, हातात येणारा वाफाळता चहा...कुणी तरी आपल्या आवडी निवडी लक्षात ठेवतंय..आपण कुणाला तरी हवे आहोत याची सुखद जाणीव....आपल्या बाळाचं निरागस हास्य, आसमंतात ऐकू येणारी सुरेल धून.... कुठून तरी कानावर पडणारा, भान हरवायला लावणारा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा पवित्र सूर........ ही यादी किती लांबवावी? यातल्या कशालाच पैसे लागत नाहीत...तरी हातचं सुख, हातचा आनंद सोडून आपण का धावत असतो मृगजळाच्या पाठी?

पण याही पेक्षा जास्त आनंद कशात मिळतो माहित आहे? दुसऱ्याला देण्यात, दुसऱ्याचे अश्रू पुसण्यात..त्याचं दुःख हलकं करण्यात! मी १० रुपये कमावले तर त्यातले ८ मी स्वतःसाठी ठेवीन पण २ तरी दुसऱ्याला देईन हा नुसता विचारही खूप आत्मिक समाधान देऊन जातो प्रत्यक्ष कृती तर आपलं एक पाऊल देवत्वाकडे घेऊन जाते....शेवटी देव तरी कशात आहे? तुमच्या माझ्यातच ना ?

विंदा करंदीकरांची एक कविता आहे

देणाऱ्याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणाऱ्याचे हात घ्यावे

आपला प्रयत्न तोच असायला हवा!

जयश्री देसाई

 
 
 

Recent Posts

See All
३ शतकांचा वनवास संपत आला !

अयोध्येतील सुवर्ण क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे ....रामाचा आधुनिक वनवास संपायचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. सारी अयोध्या एखाद्या...

 
 
 
स्वप्नपूर्तीच्या दिशेने!

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी नेत्रदीपक रोषणाईने नटलेली, आकर्षक भित्ती चित्रांनी सजलेली अयोध्या बघताना मन नकळत भूत काळात...

 
 
 
अरेरे!

शिवसेनेची आज कीव येते आहे! आधी राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेस पुढे, त्यांच्या इटालियन नेतृत्वापुढे सरकार स्थापनेसाठी...

 
 
 

Comments


bottom of page