top of page
Search

अभिवादन!

  • Writer: jayashreedesaii
    jayashreedesaii
  • Jul 31, 2020
  • 2 min read

©जयश्री देसाई


आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती देशभर खूप उत्साहात पार पडली. त्यांना अभिवादन करणाऱ्या पोस्टस तर बहुतेक सगळ्यांनीच सादर केल्या. मी नाही केली!

कालही पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी पार पडली. नेहरू- गांधी खानदानाला ओहोटी लागल्याने ती साजरी करण्याचा उत्साह कमी दिसला. पण आज स्वातंत्र्यवीरांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्याचा उत्साह खूप दिसला. बरं वाटलं. पण त्याचबरोबर असाही विचार हल्ली सतत मनात येतो आहे की आपण या पुण्यपुरुषांना फक्त त्यांच्या जयंती-पुण्यतिथीला सोशल मिडीयावर काही तरी पोस्ट टाकण्याच्या प्रतिकात्मकतेत तर अडकवून टाकत नाहीय? सत्ता ज्याच्याकडे असेल त्यांना आदर्शवत असणाऱ्या महापुरुषांना सोशल मिडीयावर बरे दिवस आलेले दिसतात आणि नंतर ते अंधाराच्या-उपेक्षेच्या खाईत खितपत पडतात... दुसरं म्हणजे या महापुरुषांच्या बाबत आपल्याला नक्की किती माहिती असते ?

सावरकर म्हणजे फक्त ‘ने मजसी ने...’ किंवा ‘जयोस्तुते...’ नाही!

सावरकर म्हणजे फक्त मार्सेलीसची उडी किंवा अंदमानातल्या यातना नाही.....

ते एक धगधगते अग्निकुंड होते...माणूस म्हणून त्यांच्यातही गुण दोष होते. पण त्यांची राष्ट्र निष्ठाच नव्हे तर त्यांचे विज्ञाननिष्ठ विचार तसेच सामरिक विचार सुद्धा महत्वाचे होते ...ते किती जणांना माहित आहेत? त्यांचं समरसतेचं कार्य, त्यांचा स्वदेशीचा विचार हाही त्यांच्या सशस्त्र लढ्याइतकाच महत्वाचा आहे. त्यातलं किती आणि काय आपल्या पैकी किती जणांना माहित आहे आणि किती जणांनी त्यातलं काही उचलायचा प्रयत्न करून बघितलाय?

माझं भाग्य की मला सावरकरांचा प्रत्यक्ष आशीर्वाद मिळालाय. मी अर्थात तेव्हा जेमतेम २-३ वर्षांची होते. त्यामुळे ती भेट माझ्या स्मरणात नाही. पण माझ्या आई -बाबांकडून ऐकल्याने हे मला माहित आहे. माई सावरकरांनी माझ्या आईची ओटी भरलीय!...हे शक्य झालं कारण तात्याराव सावरकर हे माझे वडील कै प्रभाकर अत्रे यांचं दैवत होते. माझे वडील रा स्व संघात गेले तेही बाबाराव सावरकर यांच्यामुळे गेले. त्यामुळे सावरकर सदनात बाबांचे नित्य येणे जाने होते आणि बाळाराव सावरकर, विक्रमराव सावरकर, कर्तारसिंग थत्ते आदींचे आमच्या घरी नित्य येणे जाणे होते. तात्यारावांची भेट जरी माझ्या स्मरणात नसली तरी या सगळ्यांच्या गप्पा कानावर पडत असल्याने आणि बाबा सतत बोलत असल्याने हे पाणी किती वेगळं होतं, हे मी प्रत्यक्ष बघितलं आहे.

आज म्हणूनच असा खेद होतोय की आपण एक समाज म्हणून खूप प्रतिकात्मकतेच्या आहारी जातोय. जयंत्या-पुण्यतिथ्यांना अभिवादन करणं ठीक आहे. पण त्याच्या पलीकडे आपण कधी जाणार?

माझ्या बाबांच्या डायरीतल्या २ नोंदी मला खूप अस्वस्थ करतात. तात्यारावांनी प्रायोपवेशन करून जीवनयात्रा संपवल्यावर त्या नंतरच्या वर्षी त्यांची पहिली पुण्यतिथी डोंबिवलीत साजरी व्हावी म्हणून बाबांनी खूप प्रयत्न केले. ‘मात्र त्याला यश आले नाही!’ अशी ती पहिली नोंद आहे.

मात्र त्याने नाऊमेद न होता बाबांनी व त्यांच्या काही मित्रांनी डोंबिवलीत सावरकर अभ्यास मंडळ सुरु केले. ते आजही चालू आहे

दुसरी नोंद त्या संबंधातलीच आहे. सावरकर अभ्यास मंडळाची मिटिंग कधी ठेवायची हे ठरत होतं आणि त्या दिवशी संकष्टी येत असल्याने चंद्रोदयाची वेळ पाहून मग ती बैठकीची वेळ ठरवण्याचा आग्रह बहुतेक सदस्य करत होते .....प्रखर विज्ञाननिष्ठ सावरकरांच्या विचारांच्या अभ्यासासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंडळाच्या बैठकीची वेळ संकष्टीचा चंद्रोदय कधी होतोय हे बघून ठरवणं हे मूळ हेतुवरच डांबर फासण्यासारखं होतं....त्या बद्दलचा खेद व्यक्त करणारी दुसरी नोंद आहे ........

आज सगळ्यांच्या पोस्टस पाहत असताना याच नोंदी आठवत होत्या!

त्यामुळे नाही वाटली पोस्ट करावीशी मला! त्याने काही बिघडलं असं अर्थातच नाही !

पण नको वाटते आता ही प्रतिकात्मकता!

----------------------------


ree

 
 
 

Recent Posts

See All
३ शतकांचा वनवास संपत आला !

अयोध्येतील सुवर्ण क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे ....रामाचा आधुनिक वनवास संपायचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. सारी अयोध्या एखाद्या...

 
 
 
स्वप्नपूर्तीच्या दिशेने!

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी नेत्रदीपक रोषणाईने नटलेली, आकर्षक भित्ती चित्रांनी सजलेली अयोध्या बघताना मन नकळत भूत काळात...

 
 
 
अरेरे!

शिवसेनेची आज कीव येते आहे! आधी राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेस पुढे, त्यांच्या इटालियन नेतृत्वापुढे सरकार स्थापनेसाठी...

 
 
 

Comments


bottom of page