अनुभूती गिरनारची !
- jayashreedesaii

- Jul 31, 2020
- 5 min read
गिरनार हे खूप वर्षांपासून माझं ‘ड्रीम डेस्टीनेशन’ होतं. कधी माझ्या मित्र मंडळींबरोबर, कधी नातेवाईकांबरोबर, कधी या सगळ्यांकडूनच मिळालेल्या काही कॉंटक्टस बरोबर तिथे जाण्याचा प्रयत्नही केला. गेले वर्षभर तर माझी मैत्रीण मीनल जोगळेकर व मी या बाबत अनेकदा बोललो. पण योग येत नव्हता. नंतर एक दिवस अचानक व्हाटस अॅपच्या माध्यमातून एक मेसेज माझ्यापर्यंत पोहोचला. तो होता गिरनारच्या ‘धुनी स्पेशल’ यात्रेचा. तेव्हा खरं तर ‘धुनी स्पेशल’ म्हणजे काय हेही माहित नव्हतं. पण त्यात जो नंबर होता त्या नंबरवर देवयानी जोशींना फोन केला. त्यांनी माझ्या सगळ्याच प्रश्नांची छान उत्तरं दिली आणि मी व मीनल गिरनारसाठी सज्ज झालो
माझी गिरनार यात्रा म्हणजे आरंभापासून अंतापर्यंत असंख्य प्रकारची विघ्नं अशी यात्रा होती . अचानक उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या पुस्तकाच काम आलं. ते अवघ्या आठवडाभरात पूर्ण करून द्यायचं होतं. त्या मुले रखडलेली माझी इतर कामं तर होतीच. निघण्याच्या दिवशीही सकाळी १० ला निघायचं तर मी ९ वाजेपर्यंत काम करत होते! त्यात निघण्याच्या आधी काही दिवस पायांत प्रचंड क्रॅम्पस यायला सुरुवात झाली. निदान झालं ‘डी विटामिन डेफीशियन्सी’चं. मग त्याच्या इंजेक्शन्सचा कोर्स झाला, निघण्याच्या आदल्या दिवशी तो संपला. मला बी पी चा त्रास नाही. पण शेवटच्या इंजेक्शनच्या दिवशी डॉक्टरनी बी पी चेक केलं, ते आलं १७०-१००. मग घरातल्या सगळ्यांनी माझ्या काळजीपोटी मी जाऊ नये असा आग्रह धरायला सुरुवात केली. डॉक्टरनी गोळ्या सुरु केल्या आणि चढताना अजिबात घाई न करण्याचा सल्ला दिला. ‘ब्रेथलेसनेस’ अजिबात झालाच नाही पाहिजे असं बजावलं.
मी मुळात ट्रेकर आहे. त्यामुळे मला १० हजार पायऱ्यांचं तेवढ टेन्शन नव्हतं, जेवढं या सगळ्यांच्या भडीमाराच आलं. त्यात बी पीची काही ओळखच नाही. त्यामुळे त्याने काही गडबड केली तर त्याला कसं हाताळायचं तेही माहित नाही. भिस्त होती ती दत्त गुरुंवर, माझ्या गुरूंवर, स्वामी समर्थांवर आणि शंकर महाराजांवर. म्हटलं तर हे सगळे म्हणजे एकच. पण माझं सगळ्यांशी असलेलं नातं वेगवेगळं आहे. स्वामी समर्थ मला आई -बाबांसारखे प्रेमळ वाटतात. त्यांच्याशी मी काहीही बोलू शकते. मन मोकळं करू शकते. हट्ट करू शकते. शंकर महाराजांविषयी मला काहीच माहित नव्हतं. माझ्या जावेकडून पुण्यातील त्यांच्या समाधी मठाविषयी व त्यांच्याविषयी ऐकल होतं तेवढंच. पण गेल्या २ वर्षांपासून मला त्यांचे सतत साक्षात्कार होतायत. ते माझ्या घरी येऊन गेले अशीही माझी खात्री आहे. त्यांचे मार्गदर्शन मला मिळतेय. दत्त गुरूंची कृपा तर अविरत आहेच. माझ्या मनात इच्छा यायचा अवकाश. ती जर हे सगळे पूर्ण करतायत तर ते माझी भलेही परीक्षा घेतील, पण माझी ही इच्छा पूर्ण करतील, मला काहीही होऊ देणार नाहीत याची मला खात्री होती. त्या खात्रीने मी निघाले.
गाडीत व आधीही खूप जणांकडून खूप अनुभव ऐकले होते. प्रत्येकच अनुभव थक्क करणारा. त्यामुळे स्वाभाविकच माझ्याही मनात हे सगळे अनुभव आपल्यालाही मिळावेत अशी इच्छा निर्माण झाली. नेमकं काय घडेल, काय दिसेल, काय अनुभव येतील, महाशिवरात्रीला माझ्या परिचिताला जसे तिथे शंकर महाराज भेटले तसे मलाही भेटतील का अशा अनेक प्रश्नांच्या विचारात झोप कधी लागली व जुनागड कधी आले ते कळलेच नाही. पण गंमत म्हणजे जुनागडला पहाटे उतरले तेव्हा मन पूर्णपणे निर्विकल्प झालं होतं. मनाची पाटी अगदी कोरी होणं म्हणजे काय, निर्विकल्प होणं म्हणजे काय याचा अनुभव मी घेत होते आणि ती अनुभूती अद्भुत होती.
सोमनाथला जाताना भारद्वाजाने दर्शन दिलं आणि मी व मीनल खुश झालो की शुभ शकून झाला. दर्शन नक्की होणार. मात्र माझ्या तब्येतीने फार त्रास द्यायला सुरुवात केली होती. जुनागडला उतरलो आणि मला डीसेन्ट्रीचा त्रास सुरु झाला. माझ्या टेन्शनमध्ये आणखी भर पडली. आता १० हजार पायऱ्या चढायला आपल्याला जमेल की नाही याची भीती व त्याच बरोबर गुरूंची आळवणी सुरु झाली. माझ्या मनात एक निश्चय नक्की होता की मी डोली करणार नाही. कुणाला त्रास देऊन मला दर्शन घ्यायचे नाही. दत्त गुरुंनी जर मला ही दुखणी दिली असतील तर माझी काळजीही तेच घेतील हा विश्वास मनात पक्का होता, आणि जर मला चढायला नाही जमले तर त्यांची मी दर्शन घ्यावे अशी इच्छा नाही असं मी मानेन आणि परत येईन हेही माझं निश्चित होतं.
चढायला सुरुवात झाली. डॉक्टरांचा सल्ला मनात ठेवून मी आरामात चढत होते. पाय तर गळालेले होतेच. त्यात डोलीवाल्या बिरजूने डोकं खायला सुरुवात केली की तुम्हाला नाही जमणार. डोली करा. हे त्याने इतक्या वेळेला म्हटलं की आपण डोली नाही म्हणण्याचा जो बाणेदारपणा करतोय तो योग्य की अयोग्य असा प्रश्न मनात आला. पण देवयानी, सुप्रिया, अलका, समीरदादा, गोसावीकाका या सगळ्यांनी विश्वास दिला आणि माझी चढाई सुरु राहिली. वाटेत सुप्रिया व अलका पूर्ण वेळ बरोबर होत्या. त्यामुळे जी मला एरवी कधीच कळली नसती अशी ठिकाणं त्यांनी दाखवली, काही किस्से सांगितले. त्यामुळे ही चढाई सुद्धा एक आनंदानुभव ठरली.
अंबा माता मंदिरापर्यंत म्हणजे पहिल्या ५ हजार पायऱ्या पार करायलाच साडे सहा तास लागले. मनात शंका आली की आता पुढच्या ५ हजार पायऱ्या पार करायला इतकाच वेळ लागला तर आपल्याला गुरु शिखारावरची आरतीही नाही मिळणार व धुनीही नाही मिळणार. त्यावेळी सुप्रिया म्हणाली की आपलं गणित इथे टिकतच नाही. अंबा मातेपर्यंत आपण चढायचं असतं, पुढे दत्त गुरुंचा इलाका सुरु होतो. प्रचंड वारं असतं, वातावरणच बदलतं, ते अक्षरशः खेचून घेतात. मला हे शब्दशः प्रत्ययाला आलं, कारण पुढच्या पावणेपाच हजार पायऱ्या मी अवघ्या पाऊण तासात पार करून ठीक पावणेपाचला गुरुशिखराकडे जाणाऱ्या कमानीखाली व पाच वाजून पाच मिनिटांनी दर्शनासाठीच्या रांगेत उभी होते. हे माझ्यासाठी विश्वास बसण्यापलीकडचं होत. पण ते खरं होतं. मी अखेर तिथपर्यंत पोहोचले होते!
मी रांगेत उभी असतानाच दर्शन सुरु झालं होतं. आमच्या ग्रुपमधले जे जे पुढे पोहोचले होते ते उत्फुल्ल चेहऱ्याने परत येत होते. त्यांचे समाधान त्यांच्या चेहेऱ्यावर झळकत होते. एकीकडे तुफान वारा, त्यामुळे जोरात फडफडणारे मंदिरावरचे झेंडे व कनाती, बाजुच्या दरीतील गूढ गर्भ शांतता आणि आकाशातून आमच्याकडे बघणारा पंचमीचा चंद्र...हो आम्ही गुरुशिखरावर पोहोचलो तो दिवस रंग पंचमीचा होता.
अखेर माझा नंबर आला. मी त्या पावलांच्या समोर उभी होते. मी नेलेल्या सगळ्या वस्तू मी पुजारी योगेश बापू यांच्याकडे दिल्या. त्यांनी त्या स्वीकारल्या. मी ज्या पावलांची मानस पूजा गेली इतकी वर्षं करत आले ती पावलं माझ्या समोर होती. ती मी डोळ्यांत साठवली. माझ्या मनात असलेले प्रश्न मी त्यांना विचारले. ज्या शिलेवर ती पावलं उमटलेली आहेत, त्या शिलेच्या मागील बाजुस दोन नैसर्गिक कोनाडे आहेत. एक शंकराचा व दुसरा आदी शंकराचार्यांचा. माझे जेवढे वाचन वा ज्ञान आहे त्या नुसार आदी शंकराचार्य व गिरनार हा संबंध कधी आल्याचं मला स्मरत नव्हतं. तेही मी योगेश बापुंना विचारलं. त्यांनी सांगितलं की शंकराचार्यानीही तिथे तपश्चर्या केलीय.
समाधानाने मी खाली उतरले. खाली चारच पायऱ्यांवर सुप्रिया, अलका व गोसावीकाका थांबलेले होते. गोसावीकाका म्हणाले की चला माझ्या बरोबर. परत आल्यामुळे योगेशबापू ओरडतील की काय अशी भीती मनात होती. पण गोसावी काकांनी आश्वस्त केलं आणि त्यांच्याबरोबर मी पुन्हा त्याच गुरु पावलांपाशी आले. जणु त्या गुरु माऊलीलाही मला दूर जाऊ द्यायचं नव्हतं. मला तर इच्छा नव्हतीच. सोबत सुप्रिया व अलका होत्याच. तिथे एक सद्गृहस्थ आले होते, ज्यांच्याकडे गुरु चरित्राची मूळ प्रत होती. त्यावरून ते नवी आवृत्ती तयार करत होते. त्यांनी ती प्रत, नवीन हस्तलिखीत, त्यावर रुद्राक्षाची माळ व पादुका असं सगळ गुरु पावलांवर ठेवून गोसावीकाकांच्या डोक्यावर ठेवलं आणि गोसावी काकांनी ते माझ्या व सुप्रियाच्या डोक्यावर ठेवलं. योगेश बापुंनी गुरु पावलांना ज्या चंदनाचं लेपन केलं होतं ते गंधही मला व अलकाला लावायला दिल. धुनीही बघितली. गुरु कृपेत न्हाऊन माझी वारी सुफळ संपूर्ण झाली.
आता पुन्हा मी गिरनारला जाईनच असं नाही, वारीच्या कर्म कांडात अडकायला मला आवडणार नाही. ज्या पावलांची मी आजवर मानस पूजा करत आले ती पावलं आता प्रत्यक्ष बघून मी माझ्या हृदयात कोरून ठेवली आहेत. ती माझ्या अंतरात कायम प्रकाशमान रहावीत, माझा प्रवास त्या पावलांच्याच दिशेने होत जावा अशी इच्छा आहे.
सध्या, या वारीत जे जे हाती गवसलं त्याचा अन्वयार्थ लावण्याचा, त्या प्रत्येक गोष्टीतला गूढ अर्थ शोधण्याचा प्रयत्न मी करते आहे.
मनाने अनुभवलेली निर्विकल्प अवस्था, दत्त गुरुंनी केलेले लाड, काहीही कारण नसताना झालेल्या डीसेंट्रीमुळे अक्षरशः खडीसाखरेचे दाणे तोंडात ठेवून करावे लागलेले वारीचे दिव्य, इतकी वर्षं प्रयत्न केल्यानंतर दत्त गुरुंनी यात्रेसाठी मला जो ग्रुप मिळवून दिला व जी वेळ त्यासाठी निश्चित केली त्याचा अर्थ या सगळ्या अद्भुतामध्ये गुरफटले आहे. मी पत्रकार आहे. माझी वाणी व लेखणी तिखट आहे. कदाचित मला पूर्ण वेळ खडीसाखर तोंडात ठेवून चढ -उतरण्याचा धडा त्या साठीच तर घालून दिला नसेल?—यासारखे अनेक प्रश्न मनात येत आहेत. जे माझ्या अजिबात ओळखीचे नव्हते त्यांचा एक संदेश व्हाटस अॅप वर येतो काय आणि तिथे, साधनेच्या वेगवेगळ्या स्तरावर असलेले इतके सगळे ‘ प्युअर सोल्स’ भेटतात काय...हे सगळच विलक्षण आहे .
प्रत्येक देवाची काही वैशिष्ट्यं आहेत. त्यापैकी दत्त हा देव नेट्वर्किंगमध्ये सगळ्यात ‘बाप’ देव आहे असं मला नेहेमीच वाटतं. गिरनार बाबतही मी तिथे कधी जायचं, कुणाबरोबर जायचं, कसं जायचं हे सगळं त्यानेच निश्चित केलं होतं. मी मात्र म्हणत होते मी गिरनारला जायचं ठरवलंय ...किंवा जातेय. तसं नव्हतं...तो मला घेऊन गेला आणि सुखरूप परत घेऊन आला ... स्क्रिप्ट पूर्णपणे त्याचं होतं...अनुभवांनी समृद्ध झालेलं गाठोडं मात्र माझं आहे!
---------------------------------------------------


Comments